Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 24 June, 2011

‘पोलिस - ड्रगमाफिया प्रकरणाचा छडा लावू’

‘सीबीआय’कडून तपास सुरू
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): गोव्यात अमली पदार्थाचे जाळे पसरवणारे माफिया आणि पोलिस यांच्यातील साटेलोटे प्रकरणाचा लवकरच छडा लावू, अशी घोषणा आज सीबीआयचे पोलिस अधीक्षक एस. एस. गवळी यांनी केली. या प्रकरणात राजकीय लोकांचा सहभाग आहे की नाही याबद्दल आपल्याला अजून कोणतीही ठोस माहिती मिळाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आज दुपारी बांबोळी येथे ‘सीबीआय’च्या कार्यालयात श्री. गवळी पत्रकारांशी बोलत होते. अमली पदार्थ प्रकरणाचा तपास लावण्याचे काम कालपासून हाती घेण्यात आले असून यात पोलिस ड्रगमाफिया साटेलोटे प्रकरण व दोघा इस्रायली ड्रग माफियांच्या प्रकरणांचा समावेश आहे. गोव्यात अमली पदार्थ व्यवसायाचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. आमच्याकडे या विषयी जुजबी माहिती आहे. परंतु, कोणालाही याविषयी अधिक माहिती असल्यास त्यांनी सीबीआयशी संपर्क साधून ती द्यावी, असे आवाहनही श्री. गवळी यांनी यावेळी केले.
सध्या सीआयडीच्या ताब्यात असलेल्या या प्रकरणीच्या फायली ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, या गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी गोवा पोलिसांचीही मदत घेतली जाणार असल्याचेही ते म्हणाले.
सीबीआयच्या तीन निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली आहे. अशोक जाधव, डी. के. दबास आणि श्री. दामले हे निरीक्षक तपास करणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच, गरज भासल्यास ‘त्या’ ९ पोलिसांना पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार असल्याचेही श्री. गवळी यांनी यावेळी सांगितले.

No comments: