पणजी, दि. २० (प्रतिनिधी): गोवा शिक्षण खात्यातर्फे ४५८ संगणक शिक्षकांना नेमणूकपत्रे पाठवण्यात आल्याची माहिती आज देण्यात आली. सरकारी विद्यालयांतील ८१ संगणक शिक्षकांना यापूर्वीच नियमित करण्यात आले होते. आता विविध अनुदानित विद्यालयांतील संगणक शिक्षकांची नेमणूक करून सरकारने ही प्रलंबित मागणी पूर्ण केली आहे.
विविध सरकारी तथा अनुदानित विद्यालयांत गेली अनेक वर्षे संगणक शिक्षक कंत्राटी पद्धतीवर काम करीत होते. या शिक्षकांना सेवेत नियमित करण्यावरून गेली अनेक वर्षे संघर्ष सुरू होता. अखिल गोवा संगणक शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली या शिक्षकांनी वेळोवेळी आंदोलन करून व सरकार दरबारी निवेदने सादर करून ही मागणी धसास लावण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. या संगणक शिक्षकांना सेवेत नियमित करण्यासाठी गोवा विद्यापीठातर्फे पदव्युत्तर अभ्यासक्रम सक्तीचा बनवून तो देखील त्यांच्याकडून पूर्ण करून घेतला होता. हे शिक्षक यापूर्वी कंत्राटदारामार्फत नेमण्यात आले होते. त्यानंतर त्यांना थेट शिक्षण खात्यातर्फे नेमण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. सुरुवातीला सरकारी शाळांतील संगणक शिक्षकांना सेवेत नियमित करून अनुदानित शाळांतील संगणक शिक्षकांची नेमणूक लांबली होती. आता शिक्षण खात्यातर्फे उर्वरित ४५८ संगणक शिक्षकांना नेमणूकपत्रे पाठवण्यात आल्याची माहिती उपसंचालक अनिल पवार यांनी दिली.
Tuesday, 21 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment