न्यायालयीन चौकशीचा भाजपकडून पुनरुच्चार
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): बाळ्ळी येथे आदर्श इमारतीची साफसफाई करताना कामगारांना मिळालेली एकूण २४ मानवी हाडे व जळीतकांडात बळी पडलेल्या मंगेश गावकर याचे पाकीट हे पोलिस चौकशीतील हलगर्जीपणाच दर्शवते. मंगेश गावकर याचा एक हात व पाय तोडून त्याला आगीत फेकण्याचे क्रौर्य घडल्याचा यामुळे संशय बळावतो. पोलिसांकडून प्रत्यक्ष गुन्हेगारांना अटक करण्याचे सोडून ‘उटा’च्या नेत्यांचा छळ करण्याचा प्रकार सुरू असल्याने ही चौकशी राजकीयप्रेरित असल्याचा आरोप करून तात्काळ न्यायालयीन चौकशी सुरू करावी, अशी जोरदार मागणी भाजपने केली आहे.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ही मागणी केली. याप्रसंगी भाजप सरचिटणीस गोविंद पर्वतकर व नरेंद्र सावईकर तसेच प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर हजर होते. ‘उटा’ आंदोलकांना न्यायालयीन चौकशीचे आश्वासन मुख्यमंत्री कामत यांनी दिले होते. परंतु, त्या दृष्टीने अद्याप काहीच हालचाली सुरू नसल्याने सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालीत असल्याचेच दिसून येते, अशी टीकाही प्रा. पार्सेकर यांनी केली.
दरम्यान, याप्रकरणी ‘उटा’चे नेते गोविंद गावडे, म्हाळू वेळीप यांच्यासह आमदार रमेश तवडकर, माजी आमदार प्रकाश वेळीप, नरेंद्र सावईकर यांच्यावर ३०७ कलम दाखल करण्यात आले आहे. ‘उटा’ च्या नेत्यांवरच हत्या करण्याचा आरोप ठेवण्याचा हा प्रकार म्हणजे सरकारच्या कलुषित बुद्धीचे दर्शन घडवणारा आहे, असा ठपकाही प्रा. पार्सेकर यांनी ठेवला. पोलिसांनी पंचनामा करून झाल्यावर कामगारांना मानवी हाडे व मंगेश गावकर याचे पाकीट सापडते यावरून चौकशीतील बेफिकिरी स्पष्ट होते. सरकार चौकशीच्या नावाने आदिवासींची थट्टा करीत असून भाजप हा प्रकार अजिबात खपवून घेणार नाही, असा इशाराही प्रा. पार्सेकर यांनी दिला.
भाषाप्रश्नी सरकारचा धिक्कार
क्रांतिदिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिक व स्वाभिमानी नागरिकांना अटक करण्याच्या सरकारच्या कृतीचा भाजपतर्फे धिक्कार करण्यात आला. क्रांतिदिन हा स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचा दिवस आहे. त्यांनाच दूर ठेवून पोलिसांच्या संरक्षणाखाली हा दिवस साजरा करण्याचा प्रकार अत्यंत दुर्दैवी व निषेधार्ह असल्याची टीका प्रा. पार्सेकर यांनी केली. लोकशाही पद्धतीने आपला निषेध नोंदवण्याचा अधिकारही गोमंतकीयांना उरला नाही काय, असा सवालही त्यांनी केला. येत्या सोमवार २० रोजी भाजपची व्यापक बैठक होणार असून त्यात भाषाप्रश्नी पुढील कृती ठरवण्यात येईल. भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या आंदोलनात भाजपला पूर्ण पाठिंबा राहील, असे सांगतानाच भाजपकडून काही वेगळ्या कार्यक्रमांचीही आखणी केली जाणार असल्याचे सुतोवाच यावेळी प्रा. पार्सेकर यांनी केले.
-------------------------------------------------------------
सत्यशोधक समिती स्थापन
बाळ्ळी हत्याकांड प्रकरणी प्राप्त झालेल्या नव्या पुराव्यांच्या अनुषंगाने भाजप विधिमंडळ उपनेते आमदार ऍड. फ्रान्सिस डिसोझा यांच्या अध्यक्षतेखाली एक सत्यशोधक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत डॉ. विल्फ्रेड मिस्किता, डॉ. व्यंकटेश प्रभुदेसाई, संतोबा देसाई, राजेंद्र आर्लेकर व गोविंद पर्वतकर यांचा समावेश आहे. ही समिती १५ दिवसांत आपला अहवाल पक्षाला सादर करणार असून त्यानुसार पुढील कृती ठरवली जाईल, असेही प्रा. पार्सेकर यांनी घोषित केले.
Sunday, 19 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment