क्रांतिदिनीच स्वातंत्र्यसैनिक व मातृभाषाप्रेमींना अटक
- कडेकोट सुरक्षेत क्रांतिदिन ‘साजरा
-प्रचंड जनक्षोभ उसळण्याचे संकेत
- स्वातंत्र्यसैनिकांचा बहिष्कार
- हुतात्मा स्मारकाचे क्षालन
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): गोवा मुक्तीचा सुवर्णमहोत्सवी क्रांतिदिन स्वातंत्र्यसैनिक व स्वाभिमानी नागरिकांना अटक करून व शेकडो सशस्त्र पोलिसांचे सुरक्षा कवच तयार करून साजरा करण्याची अनोखी किमया आज कॉंग्रेस आघाडी सरकारने साधली. भाषा माध्यमप्रश्नी सरकारच्या आत्मघातकी निर्णयाविरोधात मातृभाषाप्रेमींनी आज नव्या क्रांतीचे बिगूल वाजवले. संपूर्ण आझाद मैदानाला सशस्त्र पोलिसांचा वेढा घालून राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहिले व प्रचंड गदारोळात हा कार्यक्रम आटोपता घेतला. क्रांतिदिनीच सुरू झालेल्या या आंदोलनाचा भडका आगामी काळात उडणार असल्याने राज्यात सरकारविरोधात प्रचंड जनक्षोभ उसळण्याचे स्पष्ट संकेत आज मिळाले.
पणजी येथे आझाद मैदानावर आयोजित क्रांतिदिन कार्यक्रमावेळी मातृभाषाप्रेमी व स्वातंत्र्यसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सरकारने तात्काळ इंग्रजी माध्यमाला अनुदान देण्याचा निर्णय रद्द करावा, अन्यथा पुढील परिणामांना सज्ज व्हावे, असा सज्जड इशारा आंदोलनाचे नेतृत्व करणारे विष्णू वाघ यांनी यावेळी दिला. या निमित्ताने सरकारतर्फे एकूण १६ स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्यसैनिक या नात्याने हा सर्वोच्च सन्मान स्वीकारलेल्या अनेकांनी भाषा माध्यमप्रश्नावर सरकारने फेरविचार करावा, असा आग्रह धरला.
आज सकाळीच मातृभाषाप्रेमी, लेखक, कलाकार व स्वातंत्र्यसैनिकांनी आझाद मैदानावर हजेरी लावली होती.याप्रसंगी पुंडलीक नाईक, राजदीप नाईक, सुनील देसाई, गोविंद पर्वतकर, अरविंद भाटीकर, युगांक नाईक आदी हजर होते.क्रांतिदिनाचा हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा लेखक व कलाकारांच्या मेळाव्यात देण्यात आल्याने आझाद मैदानाभोवती मोठा सशस्त्र पोलिस फौजफाटा ठेवण्यात आला होता. मातृभाषाप्रेमींनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू करताच पोलिसांनी हरकत घेतली व त्यांना अटक करण्याची तंबी देण्यात आली. पोलिस अधीक्षक विजय सिंग, अधीक्षक अरविंद गावस, न्यायदंडाधिकारी साबाजी शेटये, उपजिल्हाधिकारी नारायण सावंत, उपअधीक्षक देऊ बाणावलीकर, निरीक्षक रमेश गावकर आदी या ठिकाणी हजर होते.
स्वातंत्र्यसैनिकांनाही पोलिसांचा वेढा
दरम्यान, या ठिकाणी सरकारी कार्यक्रमावर बहिष्कार टाकून बाहेर उभे असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांनाही सशस्त्र पोलिसांचा वेढा घालण्यात आल्याने काही काळ वातावरण स्फोटक बनले. पोर्तुगिजांकडूनही जी वागणूक कधी मिळाली नाही ती आता मुक्त गोव्यात दिगंबर कामत सरकारकडून मिळाली, अशी खंत यावेळी स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली, भय्या देसाई व पुनाजी आचरेकर यांनी व्यक्त केली. सरकार विरोधातील घोषणा बंद करण्यास आंदोलक तयार होत नसल्याचे लक्षात येताच पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना वाहनात कोंबण्यास सुरुवात केली. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून सरकारची लक्तरेच वेशीवर टांगली. हा निर्णय रद्द न केल्यास त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
मंत्री, आमदारांची पाठ
आज आझाद मैदानावर झालेल्या कार्यक्रमाला सरकारातील एकही मंत्री व आमदार हजर राहिला नाही. विरोधी भाजपतर्फे यापूर्वीच या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा करण्यात आली होती. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी स्वतंत्ररीत्या आझाद मैदानावर हजर राहून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
----------------------------------------------------------------
हुतात्मा स्मारकाचे क्षालन
सरकारी कार्यक्रम आटोपल्यानंतर स्वातंत्र्यसैनिकांनी हुतात्मा स्मारक पाण्याने धुऊन त्याचे शुद्धीकरण केले व सरकारतर्फे वाहण्यात आलेली पुष्पचक्रे फेकून दिली. मोठ्या संख्येने हजर असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांनी नव्याने पुष्पांजली वाहून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. याप्रसंगी नागेश करमली यांनी हुतात्म्यांना उद्देशून गार्हाणेही घातले व या सरकारला सुबुद्धी द्यावी, असे आवाहन केले. सरकारचा हा निर्णय गोव्याची अस्मिताच नष्ट करणारा ठरणार असल्याने तो बदलत नाही तोपर्यंत लढा चालूच ठेवण्याचा निर्धार यावेळी चंद्रकांत केंकरे यांनी व्यक्त केला. दिगंबर कामत हे चर्चिल यांच्या नादी लागून गोव्याचा घात करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.
Sunday, 19 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment