Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 24 June, 2011

खाण क्षेत्रांतील रहिवाशांचा जीव धोक्यात!

हवेतील प्रदूषण मर्यादेपेक्षा कितीतरी पट अधिक
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): गोव्यातील लोहखनिज खाण क्षेत्रांत हवेतील प्रदूषणाचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याने ही परिस्थिती स्थानिक लोकांच्या जीविताला हानिकारक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने या बाबतीत संबंधित खाण कंपन्यांना नोटिसा जारी करून त्याबाबतचे स्पष्टीकरण मागवले आहे.
गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील सात लोहखनिज प्रभावित क्षेत्रातील हवेतील वातावरणाचा अभ्यास केला आहे. या अभ्यासात या भागांतील हवेत २.५ व १० मायक्रॉनच्या अतिसूक्ष्म कणांचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे. मुख्य म्हणजे या भागांत लोकसंख्येचे प्रमाणही जास्त असल्याने हवेतील या प्रदूषणाचे गंभीर परिणाम लोकांच्या आरोग्यावर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हवेतील २.५ मायक्रॉनचे अतिसूक्ष्म कण हे थेट श्‍वासोश्‍वासाद्वारे थेट शरीरात प्रवेश करतात व त्यामुळे त्याचे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता जास्त असते, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सायमन डिसोझा यांनी दिली. मंडळाने या खाण प्रभावित क्षेत्रात हवामान निरीक्षण यंत्रणा बसवली आहे व दर दोन आठवड्यांत त्याचा अहवाल तयार केला जातो, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. या यंत्रणेव्दारे या क्षेत्रातील हवेत मोठ्या प्रमाणात खनिज धुळीचे कण असल्याचे आढळून आले आहे व त्यांचे प्रमाण मर्यादेच्या बाहेर असल्याची माहितीही त्यांनी दिली. खाण क्षेत्रातील प्रदूषणाव्यतिरिक्त खनिज वाहतुकीमुळेही प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. खनिजवाहू ट्रकांकडून प्रदूषण नियंत्रणाच्या अटींचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्यानेच ही परिस्थिती ओढवल्याचा ठपकाही मंडळाने ठेवला आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने कुडचडे, उसगाव, अस्नोडा, आमोणा, डिचोली, कोडली व होंडा या भागांत बसवलेल्या यंत्रणेव्दारे ही माहिती मिळवण्यात आली आहे. यापुढे अशाच पद्धतीची यंत्रणा इतर आठ ठिकाणी बसवण्यात येईल. विशेषतः ही यंत्रणा खाण क्षेत्रांतच बसवण्यात येणार असल्याने तेथील हवामानातील प्रदूषणाचे योग्य प्रमाण काढता येणे शक्य होणार असल्याचेही डॉ. डिसोझा यांनी म्हटले आहे.

No comments: