विष्णू वाघ यांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र
प्रति,
मा. मुख्यमंत्री गोवा राज्य,
महोदय,
माझ्या महाविद्यालयीन जीवनापासून मी एक रोखठोक, सडेतोड व स्वतंत्र विचारसरणीची व्यक्ती म्हणून जीवन जगत आलो आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात एक निर्भीड व झुंजार बाण्याचा पत्रकार म्हणून माझी प्रतिमा मी जपली आहे. कवी, लेखक व नाटककार या नात्याने माझ्या मायभूमीशी मी नेहमीच एकनिष्ठ राहिलो. भारतीय संस्कृती, वारसा व परंपरा आणि आपले बहुभाषिक जीवन यांच्याविषयी मी कायम अभिमान बाळगत आलो. राजकारणासारख्या गढूळलेल्या वातावरणात वावरत असतानाही माझी श्रद्धा असलेल्या नैतिक व सामाजिक मूल्यांशी मी फारकत घेतलेली नाही.
कदाचित यामुळेच सुमारे दोन वर्षांपूर्वी गोवा सरकारने माध्यम व प्रसिद्धी सल्लागार म्हणून माझी नियुक्ती केली. या काळात एक पैसासुद्धा वेतन न घेता मी या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. तथापि, आता मला या पदावर काम करायला माझी विवेकबुद्धी मला परवानगी देईनाशी झाली आहे. याला सर्वस्वी कारणीभूत आहे ती आपल्या सरकारन प्राथमिक स्तरावरील शैक्षणिक माध्यमप्रश्नी घेतलेली हुकूमशाही व लोकविरोधी भूमिका.
मी माझ्या वडिलांच्या छायेखाली वाढलो. माझे वडील नाट्य कलाकार होते. प्रखर राष्ट्रप्रेमी होते. गोवा मुक्तिसंग्रामातही त्यांनी कार्य केले. मात्र पेन्शनसाठी कधीही अर्ज केला नाही. त्याच मुशीत आम्ही घडलो. देशनिष्ठेला पर्याय नसतो हे आम्ही वडिलांकडून शिकलो. त्यासाठीच देशावर प्रेम करणार्या नागरिकांचे हक्क सत्ताधार्यांकडून हिरावून घेतले जातात आणि घटनेची नीतिमूल्ये पायदळी तुडवली जातात तेव्हा जाज्ज्वल्य देशप्रेमींना प्रखर यातना होत असतात हे आपण जाणता का मुख्यमंत्री साहेब?
येत्या १९ डिसेंबर २०११ रोजी गोवा मुक्तीचा सुवर्णमहोत्सव साजरा होणार आहे. मुक्तीचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष भव्यपणे साजरे करायचे आम्ही ठरवले होते. मात्र तुम्ही आमचे मनसुबे धुळीला मिळवले. गोव्याच्या अजून जन्माला यायच्या किती तरी पिढ्यांचे तुम्ही अतोनात नुकसान केले! साडेचारशे वर्षांच्या जुलमी पोर्तुगीज राजवटीला जे जमले नाही ते तुम्ही एका रात्रीत करून दाखवले! आमची संस्कृती, परंपरा व वारसा यांना जोडणारी मातृभाषेची नाळ तुम्ही एका अन्यायी निर्णयाची सुरी फिरवून कापून टाकली! गोव्याच्या भूमिवरून जे जे भारतीय आहे ते पुसून टाकू पाहणार्या अराष्ट्रीय प्रवृतींशी तुम्ही संगनमत केले! गोमंतकीय जनमानसाचे खच्चीकरण करण्यासाठी तुम्ही भूतकाळातील पोर्तुगीज सरंजामशाहीचे वंशज म्हणून मिरवणार्यांशी हातमिळवणी केली!
प्राथमिक स्तरावरील इंग्रजी शाळांना सरकारी अनुदानाची खिरापत वाटण्याचा तुमचा निर्णय कोकणी व मराठी या दोन्ही भाषांना बाधक ठरणार आहे. गेल्या सातशे वर्षांपासून गोमंतकीयांचे सत्त्व या दोन भाषांवर पोसले गेले आहे. मात्र या दोन्ही भाषांना तुम्ही संकटाच्या खाईत लोटले. सुवर्णमहोत्सवी वर्षातच कोकणी-मराठीचा गळा घोटणारा मुख्यमंत्री म्हणून यापुढे तुम्हाला ओळखले जाईल. कोकणी, मराठी व अन्य प्रादेशिक भाषांवर तुम्ही अन्याय केला आहातच, पण त्याहून अधिक वाईट म्हणजे या निर्णयाविरुद्ध उठलेल्या जनक्षोभाची व तीव्र लोकभावनेची साधी दखल घेण्याचे सौजन्यही तुम्ही दाखवले नाही. ६ जून २०११ रोजी कडकडीत सार्वजनिक बंद पाळून जनतेने तुम्हाला पहिला इशारा दिला. तोसुद्धा आपण बेदखल केला. उलट हा बंद भाजपच्या सहकार्याने केल्याची प्रतिक्रिया आपण व्यक्त केली. सरकारी निर्णयाच्या निषेधार्थ माझ्यासह काही कलाकारांनी स्वतःला मिळालेले पुरस्कार सरकारला परत केले. तरीही त्याची कोणतीच शरम आपल्याला वाटली नाही. सर्वांत कहर झाला तो १८ जून रोजी. १८ जून हा गोव्याचा क्रांतिदिन. गेली अनेक वर्षे सरकार व जनतेच्या सहभागाने आपण आझाद मैदानावर हा दिवस साजरा करतो. मात्र यंदा कडक पोलिस बंदोबस्तात, जनता व स्वातंत्र्यसैनिक यांना मैदानाबाहेर ठेवून आणि लेखक, कलाकार तथा विचारवंतांना कोठडीत डांबून ‘अभिनव’ पद्धतीने क्रांतिदिन साजरा करावा लागला. या लोकांना अटकाव करण्याचे आदेश आपण पोलिसांना दिले. आपणाविरुद्ध घोषणा दिल्यामुळे पणजी, मडगावात कित्येकांना अटक झाली. आगशीच्या पोलिस ठाण्यावर नेऊन काही जणांना डांबण्यात आले. या आणि अशा प्रकारच्या अनेक घटनांतून ‘आम आदमी’बद्दलच्या कळवळ्याचा आपला मुखवटा गळून पडला आहे. स्वार्थी, संधिसाधू सत्ताधीशाचा भयानक चेहरा आता उघडा पडला आहे. तुम्ही आता सर्वसामान्यांचे सेवक राहिला नसून गोव्याला पूर्वेकडचे रोम करू पाहणार्या धर्मांध शक्तींचे हस्तक बनला आहात.
हे मूळ पत्र मी आपणाला मुद्दाम इंग्रजीतून लिहिले आहे. कारण ही एकच भाषा आपणाला कळत असावी असा मला संशय आहे, पण मी आपणाला एक रहस्य सांगू इच्छितो, इंग्रजी वाचन व लेखन यात मी बर्यापैकी प्रावीण्य मिळवू शकलो. कारण प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून घेतल्यामुळे माझा व्याकरणाचा पाया बळकट झाला. कोकणी - मराठी चळवळीत असलेल्यांची मुले वा नातवंडे इंग्रजीतून शिकतात अशा प्रकारचा आरोप सातत्याने आपण व चर्चिल आलेमाव करीत असता. या पार्श्वभूमीवर मी आपणाला सांगू इच्छितो की माझे दोन पुत्र सध्या प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून शिकत आहेत. त्यामुळे एक पालक या नात्यानेही आपणाला चार शब्द सुनावण्याचा मला अधिकार आहे.
तुमच्या मंत्रिमंडळातील एक अत्यंत लबाड व कपटी मंत्री चर्चिल आलेमाव हे आम्हा प्रादेशिक भाषा अभिमान्यांच्या बाबतीत नको त्या कंड्या पिकवण्यात मग्न आहेत. आम्ही लोकांची दिशाभूल करतोय असे चर्चिलचे म्हणणे. इंग्रजी माध्यमालाच आमचा सक्त विरोध आहे आणि आम्ही पहिलीपासून दहावीपर्यंत शिक्षणाचे माध्यम मराठी किंवा कोकणी करावे म्हणून भांडतोय हा त्याचा कांगावा काही अडाणी लोकांना खरा वाटतोय. पण मुख्यमंत्री साहेब आम्ही आपणाला स्पष्टपणे सांगतो की पाचवीपासून दहावीपर्यंतच्या इंग्रजी माध्यमाला आमचा मुळीच विरोध नाही. आम्ही आक्षेप घेतलाय तो प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांच्या घशात इंग्रजी भाषा कोंबण्याच्या सरकारी निर्णयाला! ज्या वयात मातृभाषेतील ज्ञानाचे सुमधुर अमृत विद्यार्थ्याने प्यायला हवे त्याला आयुष्याच्या सुरुवातीलाच विदेशी भाषेची शँपेन का पाजता? एवढाच आमचा प्रश्न आहे. गेल्या कैक वर्षांपासून आम्ही प्राथमिक स्तरावर कोकणी - मराठीतून लिहितो, पाचवीनंतर इंग्रजी माध्यम स्वीकारतो - सर्वांचे अगदी सुरळीत चालले आहे. मग आताच मायभाषांचा चबुतरा उखडून पाडण्याची गरज का वाटू लागली? मुख्य मंत्रिमहोदय लक्षात ठेवा. कोकणी - मराठीला पर्याय म्हणून इंग्रजी कधीच उभी नाही राहू शकणार. इंग्रजी तुम्हाला ‘हंप्टी डंप्टी’ शिकवील, ‘जॉनी जॉनी, येस पापा’ शिकविल पण ‘चांदोबा चांदोबा भागलास का?’ किंवा ‘चान्याचे रातीं’ शिकवणार नाही. इंग्रजी आजच्या मुलांना मॅकडोनाल्ड, डॉमिनो किंवा फ्राईड चिकनची चटक लावू शकते, पण सान्नां, शेवया, तवसळी, कळपुटी, उड्डामेथी किंवा सांगटांच्या आंबट - तिखटाची चव नाही देऊ शकणार. इंग्रजी त्यांना बोलघेवडा बनवेल, पण ज्ञानी नाही बनवणार. आमच्या भावी पिढ्यांनी देशी भाषांचा खुराक घेण्याऐवजी इंग्रजी भाषेची कॅप्सुल खाऊन बळकट व्हावे, असे आपणाला वाटते काय? पण लक्षात ठेवा, आम्हाला हे मान्य नाही!
गोव्यामधील सर्व देशाभिमानी, स्वाभिमानी व बाणेदार जनतेच्यावतीने आम्ही आपल्या सरकारला सांगू इच्छितो - आम्ही शेवटपर्यंत लढणार आहोत! शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आणि छातीत शेवटचा श्वास राहीपर्यंत आम्ही लढा सुरूच ठेवू.
या संदर्भात जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी लिहिलेले एक वाक्य मला आठवते, शॉ म्हणतात, ‘‘एखाद्या माणसाचा आत्मविश्वास कमकुवत करणे हे तर एकदम साधे काम आहे. पण त्याच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन त्याची आत्मशक्तीच उद्ध्वस्त करणे हे मात्र निश्चित सैतानाचे काम आहे. मुख्यमंत्री साहेब, गोव्यातील प्राथमिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया तुम्ही कमकुवत तर केलाच पण अराष्ट्रीय प्रवृत्तींशी हातमिळवणी करुन पुढील पिढ्यांना उद्ध्वस्त करायच्या कारस्थानातही आपण सहभागी होण्याचे पाप केले. हे काम माणसाचे नसून हैवानाचे आहे!
माझ्या मनातील सारी सल, वेदना, अस्वस्थता आणि तळमळ मी या पत्रातून व्यक्त केली आहे. त्याचबरोबर ‘गोवा सरकारचे प्रेस व मीडिया सल्लागार’ या पदाचाही राजीनामा मी या पत्राद्वारे देत आहे. कृपया लवकरातलवकर हे राजीनामापत्र स्वीकृत करावे आणि सदर जबाबदारीतून मला मुक्त करावे.
आपला
(आता फारसा विश्वासू नसलेला)
- विष्णू सुर्या वाघ
Wednesday, 22 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment