Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 21 June 2011

पंतप्रधानपदासाठी मोदींना पसंती!

सर्वेक्षणाचा निष्कर्ष
दिल्ली, दि. २० : ‘लेन्सऑनन्यूज डॉट कॉम’ने १२ ते १६ जून दरम्यान राष्ट्रीय पातळीवर केलेल्या सर्वेक्षणानुसार पंतप्रधानपदासाठी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी यांच्यापेक्षा गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते नरेंद्र मोदी यांनाच सर्वाधिक पसंती मिळाली आहे. विद्यमान पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जागी राहुल गांधी यांना नियुक्त करण्यास नागरिक तयार आहेत. मात्र, राहुल आणि नरेंद्र मोदी असा पर्याय दिल्यास लोकांची सर्वाधिक पसंती मोदी यांनाच आहे.
देशातील १४ राज्यांच्या ४० लोकसभा मतदारसंघांमध्ये ‘लेन्सऑनन्यूज डॉट कॉम’ने पाहणी केली. या पाहणीत चार हजार मतदार सहभागी झाले होते. या सर्वेक्षणात शहरी भागांत कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकार विरोधात नाराजी दिसली. सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, ६३ टक्के लोकांनी केंद्र सरकार बदलण्याची आवश्यकता व्यक्त केली. ङ्गक्त ३२ टक्के लोकांनीच मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस आघाडीने केंद्र सरकार चालवावे, अशी इच्छा व्यक्त केली. मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांच्यातील कोणाला आपण पंतप्रधानपदी पाहू इच्छिता? असा प्रश्‍न विचारला असता, ४६ टक्के नागरिकांनी राहुल यांना तर ३४ टक्के नागरिकांनी मनमोहन यांना पाठिंबा दिला.
पंतप्रधानपदासाठी राहुल यांच्यासोबत नरेंद्र मोदी यांचा पर्याय देताच ५३ टक्के नागरिकांनी मोदींना आणि ४७ टक्के नागरिकांनी राहुल गांधी यांना पहिली पसंती दिली.

No comments: