मातृभाषाप्रेमींनी रणशिंग फुंकले
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): प्राथमिक शिक्षण धोरणात बदल करून इंग्रजी माध्यमाला मान्यता देण्याचा घातकी निर्णय रद्द करण्याची भारतीय भाषा सुरक्षा मंचाने दिलेली मुदत उद्या १८ रोजी संपत आहे. तथापि, सरकारने या प्रकरणी निर्णयात फेरबदल न करण्याची हटवादी भूमिका घेतल्याने मातृभाषाप्रेमी आक्रमक बनले आहेत. उद्या १८ जूनच्या क्रांतिदिनाचे औचित्य साधून सरकारच्या या निर्णयाविरोधात नव्या ‘क्रांती’ची घोषणा करून मातृभाषाप्रेमींनी आता थेट सरकारविरोधात रणशिंगच फुंकले आहे.
आज पणजी येथे आयोजित केलेल्या लेखक व कलाकारांच्या मेळाव्यात या संघर्षाचे स्पष्ट संकेत देण्यात आले. क्रांतिदिनानिमित्त पणजी, फोंडा व मडगाव या ठिकाणी आयोजित होणार्या सरकारी कार्यक्रमांत अभिनव पद्धतीने या निर्णयाचा निषेध करण्याची व्यूहरचना भाषाप्रेमींनी आखली आहे. यासाठी ते कोणत्या मार्गाचा अवलंब करतील हे मात्र गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे. राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना क्रांतिदिनानिमित्ताने या संघर्षाच्या दाहकतेची प्रचिती करून देण्याचा संकल्पही भाषाप्रेमींनी सोडला आहे.
उद्यापासून ठिकठिकाणी सरकारातील प्रत्येक आमदाराच्या कार्यक्रमावेळी त्यांना जाब विचारण्याचा निर्णय घेण्यात आला. तळ्यात- मळ्यात व बोटचेपी भूमिका घेणार्या आमदारांना सळो की पळो करून सोडावे व सरकारला हा निर्णय बदलण्यास भाग पाडावे, असे आवाहन आज इथे आयोजित केलेल्या लेखक व कलाकारांच्या मेळाव्यात करण्यात आले.
मातृभाषा जगण्यास बळ देते : रामदास फुटाणे
मातृभाषा विचारांना, संघर्षाला व जीवन जगण्याला बळ देते. कोकणी व मराठी या भाषा गोव्याचा श्वास आहेत व त्या मिटवून इंग्रजी लादण्यासारखे दुसरे कुकर्म नाही. इंग्रजी भाषा हे साधन असून ते साध्य नाही; त्यामुळे ती माध्यमिक पातळीवरच योग्य आहे, असे प्रतिपादन जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे यांनी मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक या नात्याने बोलताना केले. गोवेपण टिकवण्यासाठी स्थानिक भाषेतूनच प्राथमिक शिक्षण देणे गरजेचे आहे. तमाम मातृभाषाप्रेमींच्या भावनांचा आदर करून सरकारने आपला हा निर्णय बदलावा, अन्यथा गोव्याची अस्मिता नेस्तनाबूद करण्याचे पाप मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या माथी लागेल, असा घणाघातही श्री. फुटाणे यांनी केला.
गोमंतक मराठा सभागृहात प्रसिद्ध गोमंतकीय लेखक व कवी विष्णू वाघ यांनी बोलावलेल्या या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद लाभला. याप्रसंगी व्यासपीठावर भारतीय भाषा मंचच्या निमंत्रक शशिकलाताई काकोडकर, स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली, लेखक पुंडलीक नाईक, कवी पुष्पाग्रज, लीना पेडणेकर, मीना काकोडकर, मराठी अकादमीचे उपाध्यक्ष विठ्ठल गावस, कोकणी अकादमीचे अध्यक्ष एन. शिवदास आदी मान्यवर हजर होते.
यावेळी सरकारच्या या निर्णयाविरोधात उपस्थित वक्त्यांनी डागलेल्या तोफांतून या निर्णयाविरोधातील भडका स्पष्टपणे दिसत होता. प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक तथा युवा कलाकार राजदीप नाईक यांनी सरकारला युवकांच्या क्रोधाचा सामना करण्यास सज्ज राहण्याचा सज्जड इशारा दिला तर पूर्णानंद च्यारी यांनी कोकणी चळवळीच्यावेळी अवलंबिलेल्या गनिमी काव्यांनी सरकारला जेरीस आणू, अशी तंबी दिली. लोकशाही पद्धतीची भाषा सरकारला कळत नसेल तर गोव्याच्या अस्तित्वासाठी प्रसंगी शस्त्र हाती घेण्यास स्वाभिमानी गोमंतकीयांनी सज्ज व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी प्रत्येक सरकारच्या आमदाराला या आंदोलनाची झळ बसली पाहिजे व त्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घ्यावा, असा सल्ला दिला. लीना पेडणेकर, कवी पुष्पाग्रज, युगांक नाईक, प्रशांत म्हर्दोळकर, सुचिता नार्वेकर, राजू नाईक यांनी यापुढील लढा नियोजनबद्ध व संघर्षमय करण्याची गरज व्यक्त केली.
ही लोकशाहीची थट्टाच : ऍड. भेंब्रे
राज्यातील ख्रिस्ती बांधवांची दिशाभूल करून चर्चिल आपले राजकीय ईप्सित साध्य करू पाहत आहे. राज्यातील अल्पसंख्याकांचे स्वयंघोषित नेतृत्व गाजवून इंग्रजीचा घाट घालण्याचा हा निर्णय म्हणजे बहुसंख्याकांच्या भावनेचा अनादर आहे व ही लोकशाहीची थट्टा ठरल्याचा ठपका ऍड.उदय भेंब्रे यांनी ठेवला. लोकशाहीची मूल्ये न जुमानणार्यांना सत्तेबाहेर फेकून देण्याची गरज आहे. स्थानिक भाषा कायमची नष्ट करण्याची ही योजना उधळून टाका असे आवाहन त्यांनी केले.
आता लढा निर्णायक ः शशिकला ककोडकर
सरकारचा हा निर्णय गोव्यासाठी धोकादायक आहे याचा प्रत्यय गोमंतकीयांनी लोकशाही पद्धतीने शांततेत कडकडीत गोवा बंद करून सरकारला दाखवून दिला. सत्तालोभाच्या दबावाखाली सरकार आपला निर्णय बदलण्यास राजी नसल्याने आता निर्णायक लढा देण्यावाचून पर्याय नाही, असे शशिकलाताई काकोडकर म्हणाल्या.
सरकार माफिया व गुंडांचे ः नागेश करमली
गुंडाच्या व माफियांच्या धाकाखाली वावरणार्या सरकारला गोमंतकीयांचा आवाज ऐकूच येत नाही, असा घणाघाती आरोप करून मातृभाषेचा घात करणार्या सरकारला जाग आणण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी क्रांतिदिनाच्या सरकारी कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.
लढ्याला धार : वाघ
सरकारने कलाकार व साहित्यिकांना अनुदान व पुरस्कारांचे लोभ दाखवून मिंधे बनवण्याचा घाट घातला आहे. अशा आमिषांना बळी पडून या मंडळींनी आपला स्वाभिमान गहाण न ठेवण्याचे आवाहन विष्णू वाघ यांनी केले. कला व संस्कृतीचे मूळ असलेल्या मातृभाषेवरच घाला घालण्याचा हा निर्णय जोपर्यंत मागे घेतला जात नाही तोपर्यंत सर्व सरकारी कार्यक्रम उधळून लावण्याची घोषणा त्यांनी केली. यावर्षीच्या कला अकादमीच्या भजन स्पर्धा, नाट्यस्पर्धा, एकांकिका स्पर्धा आदींवर बहिष्कार टाकून सरकारला चुकीच्या निर्णयाचा प्रत्यय घडवून आणण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
----------------------------------------------------------------------
भास्कर नायक, लोलयेकर गप्प का?
सरकारने चुकीचा निर्णय घेतला खरा. परंतु, प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवा बजावताना हा चुकीचा निर्णय सरकारच्या निदर्शनास आणून देण्याची जबाबदारी प्रत्येक स्वाभिमानी सरकारी अधिकार्याची आहे. उच्च शिक्षण खात्याचे संचालक भास्कर नायक, कला आणि संस्कृती खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर, रवींद्र भवन, मडगावचे उपाध्यक्ष श्रीधर कामत, चित्रपट निर्माते राजेंद्र तालक, विशाल पै काकोडे, तसेच उद्योजक श्रीनिवास धेंपे, उद्योजक दत्तराज साळगावकर या मंडळींनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या चुकीच्या निर्णयाची कल्पना देण्याची गरज होती. त्यांचे मोैन या घातकी निर्णयाचे समर्थन ठरत असल्याचा आरोप पुंडलीक नाईक यांनी केला.
Saturday, 18 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment