Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 15 June 2011

उमेदवार्‍यांच्या घोषणांनी कॉंग्रेसमध्ये हलकल्लोळ!

मडगाव, दि. १४ (प्रतिनिधी): गोवा विधानसभेची निवडणूक अजून जाहीरही झालेली नसताना कॉंग्रेस पक्षात उमेदवार्‍यांसाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झालेल्या दिसून येत आहेत. तशातच 'उटा' आंदोलन व माध्यम प्रश्‍नावरून उसळलेल्या अस्वस्थतेचा लाभ घेऊन अनेकांनी उमेदवारीचे आपले घोडे पुढे दामटण्यास प्रारंभ केल्यामुळे सत्ताधारी पक्षात सध्या विलक्षण गोंधळाचे वातावरण माजले आहे.
गोव्यात नुकत्याच आलेल्या अ. भा. महिला कॉंग्रेसच्या उपाध्यक्षा परमिंदर कौर यांनी फातोर्डा व सांगेतील उमेदवार्‍यांबाबत केलेली घोषणा व उत्तरेतील चार मतदारसंघांतील उमेदवार जाहीर करण्याची आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी केलेली घाई यावरून कॉंग्रेसमध्ये विविध मतदारसंघांतील उमेदवार्‍यांवरून कशी लाथाळी चालू आहे त्याचेच दर्शन घडले आहे. आता या उमेदवारांच्या नावांना कॉंग्रेस श्रेष्ठींची मान्यता आहे की कौर व राणे यांनी शिताआधीच मीठ खाल्ले आहे तेही कळायला मार्ग नाही की, प्रदेश कॉंग्रेसनेही त्यावर काहीच भाष्य केलेले नाही.
कौर यांनी फातोर्डाहून महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा मोनिका डायस यांना तर सांगेहून नगरविकासमंत्री ज्योकिम आलेमाव यांचे पुत्र यूरी आलेमाव यांना आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची उमेदवारी दिली जाईल असे आपणाकडेच पक्षाच्या तिकीटवाटपाची जबाबदारी असल्याच्या आविर्भावात सांगून टाकले आहे. मात्र, त्यांच्या या निवेदनामुळे फातोर्डा मतदारसंघातून गुडघ्याला बाशिंग बांधून व या निवडणुकीची पंचतारांकित तयारी करून बसलेले प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस विजय सरदेसाई यांची विलक्षण गोची झाली आहे. कौर यांनी मोनिकाबाईंच्या पाहुणचारातून उतराई होण्याच्या भावनेतून जरी हे निवेदन केलेले असले तरी त्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवार ठरविण्याच्या पद्धतीकडे दुर्लक्ष केल्यासारखेच झाले आहे.
कौर यांनी सांगे उमेदवारीबाबत बोलताना अशीच घाई केली आहे. तेथून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने जरी यूरी आलेमाव यांचा आटापिटा चालू असला तरी कॉंग्रेस एकाच कुटुंबातील किती जणांना उमेदवार्‍या देणार यांचा विचार करावासा त्यांना वाटले नसावे, असेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसते. यूरी यांना उमेदवारी दिली गेली तर बाणावलीतून वालंकालाही ती मिळेल हे उघड आहे व तसे झाले तर एकाच कुटुंबातील चौघांना उमेदवारी देण्याचा आगळाच विक्रम कॉंग्रेसच्या खात्यावर जमा होईल. त्यामुळेच कौर यांच्या या घोषणेबद्दल त्याच पक्षातून संतप्त प्रतिक्रिया उमटलेल्या पाहायला मिळाल्या.
आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी कौर यांच्याच पावलावर पाऊल ठेवत पक्षाने उत्तरेतील चार मतदारसंघ आपणाला आंदण दिल्यासारख्याच घोषणा केल्या. त्यातून विश्‍वजित यांचा आगाऊपणा जसा दिसून आला तसेच या पक्षात उमेदवारीसाठी चालू असलेल्या साठमारीचेही दर्शन लोकांना घडले. त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना पर्ये, वाळपई, पाळी व मये या चार मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जाहीर करून कॉंग्रेस पक्षालाच 'बॅकफूट'वर ढकलले आहे. तसे त्यांच्या कार्यपद्धतीची जवळून माहिती असलेल्याला त्यांच्या या कृतीचे मुळीच आश्‍चर्य वाटणार नाही. वाळपई पोटनिवडणुकीत त्यांनी निवडणूक चिन्ह सोडल्यास कॉंग्रेसची कोणतीच मदत घेतली नव्हती व आपणाला कोणाचीच गरज नाही हे दाखवून दिले होेते. निवडणुकीची कोणतीच घोषणा झालेली नसताना उमेदवार जाहीर करून त्यांनी पक्षाची मात्र कोंडी केली आहे. त्यातही मयेतून ते आपल्या सौ.ना व पाळीतून सौ. वेरेकर यांना उभ्या करणार असा जो एक समज झाला होता त्याला मात्र त्यांच्या परवाच्या घोषणेमुळे छेद गेला आहे.
कौर व राणे यांच्या उमेदवारांची नावे घोषित करण्याच्या कृतीचे सत्ताधारी पक्षामध्ये मात्र संतप्त पडसाद उमटले असून प्रदेश कार्यकारिणीने याबाबत काय तो खुलासा करावा ही मागणी जोर धरू लागली आहे. पण माध्यमप्रश्‍न अंगलट येऊन सरकार चारही बाजूने पोळून निघत असल्याने या स्थितीत नवा वाद उपस्थित करण्याची स्थानिक नेतृत्वाची तयारी नाही की प्रदेश नेतृत्व त्याबाबत चकार शब्द काढायला तयार नाही.
दुसरीकडे कॉंग्रेसचे आमदार व संभाव्य उमेदवार यांनी आपापल्या मतदारसंघांत मतदारांना वश करण्याचे विविध मार्ग अवलंबिले असून त्यात शेती हंगामात शेतकर्‍यांना बियाणे, खत व अवजारे पुरविणे, विविध शाळांतील मुलांना सर्रास वह्या वाटणे हे उपक्रम सध्या धूमधडाक्यात सुरू आहेत. विजय सरदेसाई यांनी आज आपला ४१ वा वाढदिवस अशाच प्रकारे धूमधडाक्यात साजरा करण्याचा प्रयत्न केला. विविध वृत्तपत्रांतील जाहिराती, फातोर्डात सर्वत्र लावलेले कट आऊटस, सुरू केलेले विविध उपक्रम ही आगामी निवडणुकीचीच तयारी मानली जाते आहे.

No comments: