मातृभाषाप्रेमींचे बोडगेश्वराला गार्हाणे
म्हापसा, दि. १५ (प्रतिनिधी)
‘‘कोकणी - मराठीशी असलेली गोमंतकीयांची नाळ तोडण्यासाठी प्राथमिक स्तरावर इंग्रजीची सक्ती करण्याच्या महापापात विद्यमान सरकारमधील जे जे लोक सामील असतील त्यांना तूच तुझ्या काठीचा बडगा दाखव आणि योग्य ते शासन कर रे म्हाराजा...! मुख्यमंत्री कामत यांच्या डोक्यात इतरांनी भरलेली ही भ्रष्ट बुद्धी त्वरित नाहीशी होऊ दे आणि त्यांना सद्बुद्धी लाभून माध्यमाचा प्रश्न धसास लागू दे रे महाराजा...! आजचे हे ग्रहण कामत सरकारला बाधक ठरून त्यांना जन्माची अद्दल घडू दे रे महाराजा...! संस्कृतीच्या जतनासाठी भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या नेतृत्वाखाली पुढे सरसावलेल्या मातृभाषाप्रेमींचे रक्षण कर व त्यांच्यातील एकोपा कायम राहील असा आशीर्वाद दे रे महाराजा...! परकीय भाषा व संस्कृती जनतेवर लादणार्या सरकारला उखडून फेकून देण्याची ताकद सर्वांना मिळू दे रे महाराजा...!’’
आज दि. १५ रोजी म्हापसा येथील बोडगेश्वर मंदिरात असंख्य मराठी - कोकणीप्रेमींच्या साक्षीने मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना माध्यमप्रश्नी सुबुद्धी मिळावी यासाठी कवी विष्णू सूर्या वाघ यांनी वरील गार्हाणे घातले. तत्पूर्वी, श्री. वाघ यांनी श्री बोडगेश्वराला कांबळ व केळ्यांचा घड अर्पण केला. त्यानंतर देवस्थानचे पुजारी श्याम चोपडेकर यांनी पारंपरिक पद्धतीने सर्वांच्या वतीने गार्हाणे सादर केले. यापुढे प्रत्येक स्वाभिमानी गोमंतकीयाने आपल्या परिसरातील ग्रामदैवतानांही असेच साकडे घालावे, असे आवाहन श्री. वाघ यांनी केले. याप्रसंगी आमदार ऍड. फ्रान्सिस डिसोझा व दयानंद मांद्रेकर, संजय हरमलकर, रमेश नाईक, प्रा. मोहन नाईक, प्रा. अनिल सामंत, लेखिका हेमा नायक, कवयित्री नूतन साखरदांडे, नाट्यकलाकार राजदीप नायक राजसिंग राणे आदींची उपस्थिती होती.
उद्या कलाकारांचा मेळावा
शुक्रवार दि. १७ जून रोजी पणजी येथील गोमंतक मराठा सभागृहात संध्याकाळी ३.३० वा. कलाकारांचा एक मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला गोव्यातील सर्व कलाकारांनी उपस्थित राहून कलाकारांची ताकद या परधार्जिण्या सरकारला दाखवून द्यावी, असे आवाहनही श्री. वाघ यांनी यावेळी केले.
Thursday, 16 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment