Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 17 June, 2011

‘विविधा’चे प्राध्यापक अपघातात ठार

पाळी, दि. १६ (वार्ताहर): नावेली - साखळी येथील विविधा उच्च माध्यमिक विद्यालयात गेली १७ वर्षे अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करणारे सुर्ल भिले येथील प्रदीप गोपी आमोणकर यांचे आज (दि. १६) दुपारी १२.३० वाजता साखळी येथील शेटये प्लाझापुढील हमरस्त्यावर झालेल्या अपघातात जागीच निधन झाले.
निवडणूक अधिकार्‍यांनी सोपवलेली ‘बीएलओ’ची जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रदीप आमोणकर आज सकाळी डिचोली येथील कार्यालयात गेले होते. तेथील काम आटोपून पुन्हा ‘विविधा’मध्ये व्याख्यान देण्यासाठी जात असताना साखळी येथे त्यांना अपघात झाला. शेटये प्लाझासमोरील रस्त्यावर पाण्याच्या प्रवाहाने वाहत आलेल्या एका मोठ्या दगडाला चुकवण्याच्या प्रयत्नात असतानाच पाठीमागून येणार्‍या सिमेंटवाहू टेम्पोने (क्र. जीए ०४ टी ७८६९) त्यांच्या जीए ०४ ए ०९४४ या क्रमांकाच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यात ते रस्त्यावर कोसळले असता टेम्पो सरळ त्यांच्या अंगावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. अपघातास कारणीभूत ठरलेला टेम्पोचालक बसप्पा वर्लाप्पा याला अटक करण्यात आली आहे. पंचनामा हवालदार गणेश जोशी यांनी केला असून डिचोली उपनिरीक्षक तुकाराम वाळके पुढील तपास करत आहेत.
मयत प्रदीप आमोणकर यांच्या पश्‍चात पत्नी, पाच व दोन वर्षांचे दोन मुलगे, आईवडील, संतोष व सुबोध हे दोघे भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. हाडाचे शिक्षक अशी ख्याती असलेल्या प्रदीप आमोणकरांचा कला व सांस्कृतिक क्षेत्रातही वावर होता. विविध विषयांवर पथनाट्ये लिहून ती ते सादर करायचे. ‘म्हादई बचाव’ हे त्यांचे पथनाट्य गोवाभर सादर झाले होते. धालो, फुगडी व लोकवेद या विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता.
प्रदीप आमोणकरांच्या अकाली जाण्याने विविधा विविधा उच्च माध्यमिकचे अतोनात नुकसान झाले आहे, अशी हळहळ पाळीचे आमदार तथा विविधा परिवाराचे सर्वेसर्वा प्रताप गावस यांनी व्यक्त केली. एका जिगरबाज दोस्ताला व समर्पित शिक्षकाला आपण मुकलो असल्याचे ते म्हणाले. प्रदीप आमोणकर हा लोकवेदाचा चालताबोलता ग्रंथ होता, अशी प्रतिक्रिया डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली. डिचोली तालुक्यात कला व संस्कृतीला उभारी देण्यासाठी ते हिरिरीने झटत होते, असेही ते म्हणाले.
उद्या दि. १७ रोजी सकाळी ११ वाजता प्रदीप आमोणकर यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

No comments: