Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 17 June 2011

‘कॉंग्रेस बेईमान!’

१६ ऑगस्टपासून अण्णांचे बेमुदत उपोषण
नवी दिल्ली, दि. १६ : जनलोकपालवर दोन मसुदा विधेयक मंत्रिमंडळापुढे सादर करण्याचा जर सरकारचा प्रस्ताव असेल तर मग, विधेयकाचा मसुदा तयार करण्याकरिता संयुक्त मसुदा समिती स्थापन करण्याची गरजच काय होती, असा स्पष्ट सवाल करीत, केंद्रातील कॉंगे्रसचे सरकार बेईमान असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला. ‘येत्या १६ ऑगस्टपासून मी जंतर मंतर येथे बेमुदत उपोषण सुरू करेन आणि या उपोषणावर सरकारने दडपशाही केली तर, लाठी व गोळ्या खाऊन बलिदान देण्याचीही माझी तयारी असेल’, असेही हजारे यांनी जाहीर केले.
भ्रष्टाचाराचा नायनाट करणारे लोकपाल विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पारित करण्यात आले नाही तर; जंतर मंतर येथूनच पुन्हा एकदा आंदोलनाचे रणशिंग ङ्गुंकण्यात येईल, असा इशारा हजारे यांनी दिला. आम्ही सरकारच्या आश्‍वासनावर विश्‍वास ठेवून आंदोलनाला केवळ ‘ब्रेक’ दिला आहे; ते पूर्णपणे मागे घेतलेले नाही. सिव्हिल सोसायटीकडून आलेले सर्वच प्रस्ताव मान्य करण्याचे आश्‍वासन सरकारने दिले होते. पण, आता हे सरकार दगाबाजी करीत आहे, असा आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
सिव्हिल सोसायटीच्या सदस्यांनी आपला वेगळा मसुदा तयार करावा, हे ऐकून मला आश्‍चर्य वाटले. दोन मसुदा विधेयक मंत्रिमंडळापुढे विचारार्थ सादर करण्यामागे नेमके काय कारण आहे, हे मला अद्याप कळलेले नाही. दोन मसुदा विधेयकच तयार करायचे असतील तर, सरकार आणि सिव्हिल सोसायटी यांच्या दोन स्वतंत्र समित्या स्थापन करता आल्या असत्या. त्यासाठी मसुदा समिती स्थापन करून इतके नाटक करण्याची काहीच गरज नव्हती, असा टोलाही अण्णांनी हाणला. सरकार आपल्या वचनांवरून मागे ङ्गिरत असल्याचे स्पष्ट संकेत आता मिळू लागले आहेत. सरकारने जर आमचा विश्‍वासघात केला तर, आम्हांला पुन्हा एकदा आपले आंदोलन छेडण्यावर गंभीरपणे विचार करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.

No comments: