पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): खाजगी आणि सरकारी तत्त्वावर (पीपीपी) जिल्हा इस्पितळ चावायला ‘रेडियंट लाइफ केअर प्रा. लि.’ कंपनीला कोणत्या निकषांवर मंजुरी दिली, असा प्रश्न उपस्थित करून ही परवानगी त्वरित रद्द करावी, अशी मागणी करणारी याचिका आज ‘शालबी हॉस्पिटल’ने मुंबई उच्च न्यायालयात सादर केली आहे. उद्या सकाळी सदर याचिका सुनावणीस येण्याची शक्यता आहे.
म्हापसा जिल्हा इस्पितळ ‘पीपीपी’ तत्त्वावर सुरू करण्यासाठी राज्य सरकारने निविदा जाहीर केल्या होत्या. त्यानुसार, चेन्नई येथील अपोलो हॉस्पिटल, अहमदाबाद येथील शालबी हॉस्पिटल आणि रेडियंट लाइफ केअर प्रा. लि. या कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. अपोलो हॉस्पिटलने ‘पीपीपी’ तत्त्वावर सदर इस्पितळ सुरू करण्यास १४० कोटी रुपयांची भागीदारी करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवला होता. रेडियंट लाइफ केअर कंपनीने ३९.४० कोटी रुपयांची सहभागी मागितली होती. तर, याचिकादार शालबी हॉस्पिटलने राज्य सरकारकडे पैशांची मागणीच केली नव्हती. तरीही हे इस्पितळ चालवण्याची मंजुरी ‘रेडियंट’ला देण्यात आली. यावर शालबी हॉस्पिटलने आक्षेप घेतला आहे. तसेच, या कंपनीला हे इस्पितळ चालवण्याची परवानगी सरकारने कोणत्या निकषांवर दिली आहे, यावरही याचिकादाराने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आज सकाळी या संदर्भातील याचिका सादर झाली असता न्यायालयाने ती दाखल करून घेतली.
------------------------------------------------------------------
‘पीपीपी’त ४० कोटींचा गोलमाल!
म्हापसा जिल्हा इस्पितळाच्या ‘पीपीपी’करणात सुमारे ४० कोटी रुपयांचा गोलमाल झाल्याचा संशय भाजपतर्फे व्यक्त करण्यात आला असून या इस्पितळाच्या खाजगीकरणास कडाडून विरोध केला आहे. जिल्हा इस्पितळाचे खाजगीकरण होणार नाही, असे स्पष्ट आश्वासन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी विधानसभेत दिले होते. आता ‘रेडियंट लाइफ केअर प्रा. ली.’ या कंपनीला या इस्पितळाचा ताबा देण्याचे ठरवून आरोग्यमंत्र्यांनी विधानसभेचा हक्कभंग केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केला. जिल्हा इस्पितळाबाबतच्या निर्णयात विरोधी पक्षाला विश्वासात घेण्याच्या आश्वासनालाही पाने पुसण्यात आल्याची टीका करून या ‘पीपीपी’ कंत्राटात सुमारे ४० कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. हा घोटाळा लवकरच जनतेपुढे आणून आरोग्यमंत्र्यांचा पर्दाफाश केला जाईल, असा गौप्यस्फोटही पर्रीकर यांनी केला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment