Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 12 June 2011

नरेंद्र व प्रशांत फळदेसाई यांच्या विरोधात ‘लुकआऊट’ नोटीस

‘उटा’ च्या दोन नेत्यांना अटक
पणजी, दि. १० (प्रतिनिधी): बाळ्ळी जळीतकांड प्रकरणातील मुख्य संशयित दीपक फळदेसाई हा गुन्हा अन्वेषण विभागाला शरण आल्यानंतर आज या प्रकरणातील अन्य संशयित नरेंद्र फळदेसाई व प्रशांत फळदेसाई यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली. गोविंद गावडे व मालू वेळीप या ‘उटा’ च्या नेत्यांना जबानीसाठी पाचारण करून अटक करण्यात आली. दंगल घडवणे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
मंगेश गावकर व दिलीप वेळीप या दोन आदिवासी युवकांच्या जळीतकांडाची चौकशी गुन्हा अन्वेषण विभागातर्फे सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित दीपक फळदेसाई याला जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळून चार दिवस उलटले तरीही पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती काल ९ रोजी तो पोलिसांना शरण आला. त्यानंतर लगेच ‘उटा’ च्या नेत्यांना अटक करून पोलिसांना नेमके काय सिद्ध करायचे आहे, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. दरम्यान, या प्रकरणातील अन्य दोन संशयित नरेंद्र फळदेसाई व प्रशांत फळदेसाई यांना जबानीसाठी आज पाचारण करण्यात आले होते; परंतु त्यांनी गुन्हा विभागाकडे पाठ फिरवल्याने त्यांच्याविरोधात ‘लुकआऊट’ नोटीस जारी करण्यात आली आहे.
दीपक फळदेसाई याच्याविरोधात पोलिसांकडे भक्कम पुरावे असल्याचा दावा अटकपूर्व जामिनाच्या युक्तीवादाप्रसंगी करण्यात आला. तथापि, जामीन फेटाळून चार दिवस उलटूनही पोलिसांनी दीपकला अटक का केली नाही, असाही सवाल उपस्थित झाला आहे. दीपक स्वतःहून पोलिसांना ९ जून रोजी शरण आला. दीपकसह अन्य दोन संशयित नरेंद्र फळदेसाई व प्रशांत फळदेसाई यांच्या अटकेची शक्यता असतानाच आज अचानक गुन्हा विभागाने ‘उटा’ चे नेते गोविंद गावडे व मालू वेळीप यांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांवर प्रचंड राजकीय दबाव असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. जळीतकांडाबरोबरच ‘उटा’च्या आंदोलनातील हिंसाचाराचाही तपास करण्याचा दबाव पोलिसांवर येत आहे. ‘उटा’ च्या नेत्यांनाही लक्ष्य बनवून बाळ्ळीतील फळदेसाई समूहाचा रोष कमी करण्याची योजना आखण्यात आल्याची खात्रीलायक खबर आहे.
दीपकला १४ दिवसांचा रिमांड
बाळ्ळी प्रकरणी पोलिसांना शरण आलेला दीपक फळदेसाई याला न्यायालयासमोर हजर केला असता त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. दीपक फळदेसाई याच्याकडून बाळ्ळीतील जळीतकांड प्रकरणातील महत्त्वाची माहिती पोलिसांकडून मिळवली जाण्याची शक्यता आहे.
गीतेश नाईकला ५ दिवसांची कोठडी
दरम्यान, भाईड कोरगाव येथील बेकायदा खाण प्रकरणी काल गुन्हा विभागाने अटक केलेल्या गीतेश नाईक याला आज न्यायालयासमोर हजर केला असता त्याला ५ दिवस पोलिस कोठडी ठोठावण्यात आली. गीतेश नाईक याच्याकडून या खनिज साठ्याच्या वाहतुकीबाबतची माहिती पोलिसांकडून मिळवली जाणार असून तदनंतर अन्य काहीजणांनाही अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

No comments: