Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 16 June, 2011

वास्कोत ५२ विद्यार्थ्यांना विषबाधा

माध्यान्ह आहारात शिजलेली पाल - एक विद्यार्थिनी गंभीर

- मुरगाव हायस्कूल, सुशेनाश्रम विद्यालयाला फटका
- सरस्वती महिला मंडळ पुन्हा चर्चेत, कंत्राट रद्द
- मंडळप्रमुख ऊर्मीला साळगावकर फरार, आचारी अटकेत


याच महिला मंडळातर्फे देण्यात आलेल्या माध्यान्ह आहारातून ८ ऑगस्ट २००९ रोजी सडा येथील युवक संघ विद्यालयातील ९ मुलगे व ९ मुलींना विषबाधा झाली होती. त्यानंतर १० ऑगस्ट २००९ रोजी गांधीनगर येथील सरकारी शाळेत अशाच प्रकारची घटना घडून ६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. तेव्हा शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सदर महिला मंडळाचे कंत्राट रद्द करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र पुन्हा याच मंडळाला कंत्राट देण्यात आले. कॉंग्रेसच्या जवळ असल्यानेच ऊर्मीला साळगावकर यांना कंत्राट दिले गेल्याचा आरोप येथील पालकांनी केला आहे.
---------

वास्को, दि. १५ (प्रतिनिधी)
सडा - वास्को येथील मुरगाव हायस्कूल व श्री सुशेनाश्रम विद्यालयाला सरस्वती महिला मंडळातर्फे पुरवण्यात आलेल्या माध्यान्ह आहारात पाल सापडून ५२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर आहे. मुरगाव पोलिसांनी सदर महिला मंडळाच्या प्रमुख ऊर्मीला साळगावकर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला असून त्या सध्या फरारी आहेत तर स्वयंपाकी सदाशिव पुजारी (रा. बोगमाळो) याला अटक करण्यात आली आहे. सदर मंडळाचे कंत्राट रद्द करण्यात असल्याची माहिती शिक्षण संचालिका सेल्सा पिंटो यांनी दिली आहे.
आज सकाळी सडा येथील मुरगाव हायस्कूलचे विद्यार्थी माध्यान्ह आहार घेत असताना सातवीत शिकणार्‍या १२ वर्षीय अक्षता सुरेंद्र नाईक हिला तिच्या बशीत शिजलेली पाल आढळून आली. सदर प्रकार लक्षात येताच तिने तो शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिला. तेव्हा सर्वांची एकच धावपळ उडाली. मात्र तोपर्यंत बहुतेक विद्यार्थ्यांनी आहार सेवन केला होता. काही वेळाने सहावी व सातवीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने प्रथम अकरा जणांना व नंतर ५० विद्यार्थ्यांना चिखलीच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, सरस्वती मंडळातर्फे येथील श्री सुशेनाश्रम विद्यालयालाही माध्यान्ह आहार पुरवण्यात आला होता. या विद्यालयात सातवीत शिकणारा झेवियर पाशेको याची प्रकृती बिघडल्याने त्यालाही कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मंडळातर्फे एकूण पाच शाळांना माध्यान्ह आहार पुरवण्यात येतो. मात्र अन्य शाळांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी हा आहार विद्यार्थ्यांना दिला नाही व त्यामुळेच पुढील अनर्थ टळला.
दरम्यान, विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहारातून विषबाधा झाल्याचे विद्यार्थ्यांच्या पालकांना समजताच त्यांनी कुटीर रुग्णालयात धाव घेतली. सरस्वती महिला मंडळाकडून पुन्हा हलगर्जीपणा झाल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. रुग्णालयात दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा उलट्या होत असल्याचे व काहींना असह्य पोटदुखीचा त्रास होत असल्याचे येथे भेट दिली असता दिसून आले.
दरम्यान, रेणुका परब या १२ वर्षीय विद्यार्थिनीची प्रकृती खूपच बिघडल्याने तिला नंतर गोमेकॉ इस्पितळात हालवण्यात आले तर विषबाधेची शिकार झालेली शुक्रिया सावंत ही उलट्या करताना खाली पडून तिच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने तिलाही बांबोळीला नेण्यात आले. रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार, कुटीर रुग्णालयातील काही विद्यार्थ्यांना घरी जाऊ देण्यात आले आहे.
दरम्यान, सदर प्रकाराची माहिती मिळताच मुरगावचे आमदार मिलिंद नाईक, काणकोणचे आमदार विजय पै खोत, महसूल मंत्री जुझे फिलिप डिसोझा, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक ऍलन डीसा, शिक्षण संचालिका सेल्सा पिंटो, उपसंचालक अनिल परब व इतर अनेकांनी कुटीर रुग्णालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांचा प्रकृतीची चौकशी केली.
मुरगाव पोलिसांनी मंडळप्रमुख ऊर्मीला साळगावकर यांच्या विरुद्ध भा. दं.सं. ३३६ तसेच अन्य कलमांखाली गुन्हा नोंद केला असून त्यांचा शोध जारी असल्याची माहिती मुरगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक राजन निगळे यांनी दिली.

No comments: