Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 18 June, 2011

‘टायगर्स’चे दिमाखदार उद्घाटन!

कलावंत उद्योगपती दत्तराज साळगावकरांचा अनोखा आविष्कार
पणजी, दि. १७ (विशेष प्रतिनिधी): छंद कसे जोपासावे हे एखाद्याने उद्योगपती दत्तराज साळगावकरांकडून शिकावे! ज्या आत्मविश्‍वासाने ते उद्योग व्यवसायाबद्दल बोलतात तितक्याच निष्ठेने ते आपल्या कलेविषयीही बोलतात. उद्योग त्यांच्या रक्तात भिनलेला आहे तर, ‘फोटोग्राफी’ त्यांच्या हृदयात वसली आहे. अथक परिश्रमाने गेली सुमारे १० वर्षे त्यांनी स्वतःच्या कॅमेर्‍याने बंदिस्त केलेले वाघ - वाघिणींचे रानावनांतील फोटो आज वाघाच्या दिमाखानेच उभे आहेत.
दत्तराज साळगावकरांनी भारतातील अनेक अभयारण्यांत, प्रामुख्याने मध्यप्रदेशातील रणथंबोर येथे आपल्या कॅमेर्‍यात बंदिस्त केलेल्या वाघांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज सुनापरान्त या त्यांच्या आल्तिनो येथील कलाकेंद्रात सुप्रसिद्ध व्याघ्रसंवर्धक अनीश अंधेरीया यांच्या हस्ते झाले. अभयारण्यांत तसेच रानावनांत निसर्गाच्या कुशीत पहुडलेल्या अनेक या उमद्या प्रजातीचे ३७ फोटो भिंतीवर दिमाखात प्रदर्शित झाले आहेत.
दत्तराजांच्या हौसेला जरी मोल नसले तरी त्यांच्या फोटोंना मात्र ते नक्कीच आहे. सुमारे रु. ९,००० ते रु. १९,५०० पर्यंत किंमत असलेल्या या चित्रांच्या विक्रीतून येणारी रक्कम मध्यप्रदेशातील ‘टायगर गार्डस’ या व्याघ्र संवर्धक संस्थेला दिली जाईल.
अनेक निमंत्रित पाहुण्यांच्या घोळक्यात उत्साहाने मिसळत व त्यांच्याकडून अभिनंदन स्वीकारतानाच पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘मला वन्यप्राणी खूप आवडतात आणि सगळ्यांत जास्त मला वाघ आवडतो; कारण त्याच्यात बुद्धिमत्ता आणि निर्भयता हे दोन्ही गुण आढळतात. शिवाय वाघ हे एक सुंदर, उमदा व भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. या प्राण्याला त्याच्या स्वतःच्या राज्यात बघण्याचा व कॅमेर्‍यात टिपण्याचा आनंद काही औरच आहे. गेली दहा - पंधरा वर्षे मी फोटोग्राफी करतो आहे. वयाच्या १०व्या वर्षात मला हा छंद लागला व तो मी दैनंदिन कामाच्या व्यापातून वेळ काढून जोपासला’’.
लहानपणी मुक्या प्राण्यांबद्दल माया आईने लावली तर वडिलांनी भेट म्हणून दिलेल्या एका जपानी कॅमेर्‍यामुळे दत्तराजना फोटोग्राफीचा नाद लागला. सुरुवातीला छोटी मोठी चित्रे त्यांनी काढली. महाविद्यालयीन जीवनात मुंबईत असताना त्यांनी काढलेल्या त्यांच्याच पुतण्याच्या चित्राला प्रथम बक्षीस मिळाले. तेव्हापासून दत्तराजनी छायाचित्रे टिपण्याचे आपले प्रयोग त्या कॅमेर्‍याने सुरूच ठेवले. मुंबईत फोटोग्राफीचे जुजबी प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी केनन, निकोनवरून ‘एसएलआर’ आणि ‘टेलीफोटोस लेन्सेस’पर्यंत मजल मारली.
आपल्या फोटोग्राफी विषयी बोलताना, रानावनांतील अनुभव सांगताना या यशस्वी उद्योगपतीचा ऊर सार्थ अभिमानाने भरून येतो. ‘‘कधी कधी मला रानावनात ४-५ तास एका जागी ठाण मांडून बसावे लागले. वाघापासून अगदी ५० फुटांवरून देखील मी फोटो टिपला आहे’’, असे ते उत्साहाने सांगू लागतात.
रानात पहुडलेली सुंदर वाघाची जोडी, कान टवकारून सावधपणे ओहोळातील पाणी पिणारा वाघ, प्रचंड खडकाखाली सुस्तावलेला, अक्राळविक्राळ जबडा फाकलेला, रागीट डोळ्यांनी सावज टिपण्यासाठी सज्ज झालेला, तसाच मृदू डोळ्यांनी जोडीदाराची वाट पाहणारा वाघ, खडकाच्या मांडीवर पहुडलेला, मान वळवून पाहणारा, सावजाचा ठाव घेणारा अशा अनेक व्याघ्रमुद्रा दत्तराजनी अचूक टिपल्या आहेत. वाघाच्या चाहुलीने भल्याभल्यांचा थरकाप उडतो, पण वाघाचे फोटो अगदी जवळून काढतानादेखील दत्तराजांचा हात अजिबात हाललेला नाही याची ग्वाही त्यांची चित्रेच देतात. प्रामुख्याने भारत आणि दक्षिण आफ्रिकेत त्यांनी वन्यप्राण्यांची फोटोग्राफी केली आहे.
रानात आपल्याला वाघाची भीती कधीच वाटली नाही हे सांगतानाच गोव्यातील रस्त्यांची मात्र फार भीती वाटते, अशी कोपरखळी त्यांनी मारली. गोव्यातील रस्त्यांवर होणारे वाहन अपघात आणि त्यातून होणारी जीवितहानी याबद्दल त्यांनी खेद प्रकट केला.
‘टायगर्स’ हे प्रदर्शन २१ तारखेपर्यंत सर्वांसाठी सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत खुले असेल. या प्रदर्शनाला आज मिळालेला प्रतिसाद पाहून यापुढे अशीच प्रदर्शने भरविण्याचा त्यांचा मानस आहे.

No comments: