पालक आणि विद्यार्थी खवळले
शिक्षणखात्याच्या अब्रूची लक्तरे
मडगाव, दि. ११ (प्रतिनिधी): बारावीच्या निकालात अंतर्गत मूल्यमापन गुणांचा घोळ, त्यानंतर दहावीच्या निकालात क्रीडाविषयक गुणांवरून गोंधळ आणि पाठोपाठ ‘जीसीईटी’ निकालात उत्तीर्णांची भलतीच यादी जाहीर झाल्याने गोव्याच्या शिक्षण खात्याच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी यांना कमालीचा मनःस्ताप सोसावा लागला आहे. या भोंगळ प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, असे आज येथे उपस्थित पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी निक्षून बजावले.
जीसीईटीच्या परीक्षेनंतर मेडिकल किंवा इंजिनीयरींगला प्रवेश घेणार्या विद्यार्थांच्या उत्तीर्ण यादीतच घोळ झाला आहे. तांत्रिक शिक्षण संचालनालयाने या परीक्षांचा निकाल नोटीस बोर्डवर लावला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संबंधित शाखेतील प्रवेशासाठी तयारी केली. मात्र रात्री अचानक ही यादी बदलून जीवशास्त्र विषयात प्रत्येकी दोन गुणांची वाढ करण्यात आली आणि नव्याने ती यादी लावण्यात आली. या सुधारित यादीमुळे अनेक विद्यार्थ्यांसाठी मेडिकल किंवा इंजिनीयरींग प्रवेश कठीण बनला आहे. मूळ यादी दोन दिवसांपूर्वी लावण्यात आली होती. त्यापैकी तीस विद्यार्थ्यांचे गुण वाढवण्यात आल्याचे पालकांनी आज पत्रकारांना पुराव्यासह दाखवून दिले. वास्तविक तांत्रिक शिक्षण संचालनालयाने घालून दिलेल्या नियमांनुसार एकदा जाहीर झालेला निकाल बदलण्याचा अधिकार कोणालाही नाही. काही विद्यार्थ्यांना मेडिकलला प्रवेश मिळावा यासाठी हा द्राविडी प्राणायाम करण्यात आल्याचा आरोप संतप्त पालकांनी केला आहे. जीवशास्त्र विषयात जर चुकीचा प्रश्न आला असेल तर सर्वच मुलांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे. मात्र मोजक्याच विद्यार्थ्यांवर मेहेरनजर करण्यात आल्यामुळे या यादीत तळाला असलेल्या मुलांनाही आता ‘बढती’ मिळाली आहे. या एकूणच भोंगळ कारभारामुळे मुले आणि त्यांच्या पालकांना मानसिक धक्का बसला आहे. तांत्रिक शिक्षण संचालनालयाच्या या भोंगळ कारभाराबद्दल पालकांनी आज येथे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यादी नेमकी कोणत्या कारणास्तव बदलण्यात आली याबद्दल कोणताही स्पष्ट खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळेच पालक आणि विद्यार्थी खवळले आहेत. या प्रकाराला जबाबदार असणार्यांविरुद्ध सरकारने कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी पालकांनी आज येथे पत्रकारांसमोर केली.
Sunday, 12 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment