Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 14 June, 2011

‘स्वाभिमानी गोवेकर बदला घेईल’

सरकारी परिपत्रकाची ठिकठिकाणी होळी
पाळी, दि. १३ (वार्ताहर): गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात गोव्याच्या संस्कृती संवर्धनासाठी दिगंबर कामत सरकार दूरगामी निर्णय घेईल अशी अपेक्षा होती. मात्र गोमंतकीय संस्कृतीचा गळा घोटणारा इंग्रजी माध्यम शाळांना अनुदान देण्याचा घातकी निर्णय घेऊन मुख्यमंत्री कामत यांनी समस्त गोमंतकीयांचा अपमान केला आहे. या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय स्वाभिमानी गोवेकर राहणार नाही, असे प्रतिपादन भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या गोवा शाखेच्या अध्यक्षा ऍड. स्वाती केरकर यांनी केले.
भारतीय भाषा सुरक्षा मंचातर्फे आज राज्यातील विविध ठिकाणी सरकारने इंग्रजी माध्यम शाळांना अनुदान देण्याच्या काढलेल्या परिपत्रकाची होळी करण्यात आली. म्हापसा, काणकोण व साखळी येथे मातृभाषाप्रेमींनी या परिपत्रकाची होळी करून सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवला. साखळी येथील निषेध कार्यक्रमात स्वाती केरकर बोलत होत्या. यावेळी साखळी भाषा सुरक्षा मंचाचे अध्यक्ष ऍड. नारायण सावंत, शिक्षणतज्ज्ञ श्यामसुंदर कर्पे, भीमराव रामराव देसाई, अरुण नाईक, दामोदर नाईक, सौ. शुभदा सावईकर, श्री. म्हापणे, आशिष ठाकूर, ऍड. करुणा बाक्रे तसेच असंख्य मातृभाषाप्रेमी उपस्थित होते.
यावेळी शिक्षण खात्याच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली व दिगंबर कामत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ऍड. नारायण सावंत, सौ. शुभदा सावईकर, श्यामसुंदर कर्पे, दामोदर नाईक, सदानंद काणेकर आदींची यावेळी सरकारचा निषेध करणारी भाषणे झाली.

No comments: