राष्ट्रवादीतर्फे सुरेश परूळेकरांवर जबाबदारी
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): राज्यातील अनुसूचित जमातीचा रोष पत्करलेला कॉंग्रेस पक्ष इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) पाठिंब्यापासूनही दुरावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. विरोधी भाजप पक्षातील ‘ओबीसी’ नेत्यांचा वरचष्मा स्पष्टपणे जाणवत असताना आता आघाडीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेच कॉंग्रेसकडील या घटकाच्या मतपेढीला सुरुंग लावण्याची जोरदार तयारी चालवली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात दाखल होऊन वरिष्ठ उपाध्यक्षपद मिळवलेले माजी मंत्री सुरेश परूळेकर यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत ‘ओबीसी’च्या उमेदवारांना तिकिटे देण्यात भाजपने आघाडी घेतली व त्याचे परिणाम म्हणून भाजपकडे सर्वांत जास्त सात ‘ओबीसी’ आमदारांची संख्या आहे. बहुजन समाजाचे नेते रवी नाईक यांना अखेरच्या क्षणी मुख्यमंत्रिपद नाकारून यापूर्वीच कॉंग्रेस श्रेष्ठींनी या घटकाची नाराजी ओढवून घेतली आहेच; त्यात विधानसभेत या घटकाला २७ टक्के आरक्षण देण्याबाबतचा ठराव सर्वसंमतीने मंजूर होऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा मुद्दा भाजपने उचलून कॉंग्रेसची कोंडी केली आहे. फातोर्ड्याचे भाजप आमदार दामोदर नाईक तसेच ‘ओबीसी’चे प्रतिनिधित्व करणार्या पक्षाच्या इतर आमदारांनी सभागृहात वेळोवेळी ‘ओबीसी’ आरक्षणाचा विषय उपस्थित करून सरकारला धारेवर धरण्याची एकही संधी गमावली नाही. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेही आपली नजर या घटकाकडे केंद्रित केली आहे.
बहुजन समाजाचे अन्य एक नेते तथा माजी मंत्री सुरेश परूळेकर यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेश म्हणजे याच रणनीतीचा एक भाग असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. बहुजन समाजाचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करून या घटकाला राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे खेचण्याचे जोरदार प्रयत्न सुरेश परूळेकर यांनी चालवले आहेत. कॉंग्रेस पक्षात अल्पसंख्याक नेत्यांना मिळणारे अतिमहत्त्व व श्रेष्ठींकडूनही वेळोवेळी त्यांना मिळणारे झुकते माप या पक्षातील इतर नेत्यांसाठी डोकेदुखी ठरले आहे. एकाच सासष्टी तालुक्यातील नेत्यांना मंत्रिमंडळात मिळालेले स्थान हा देखील कॉंग्रेस पक्षात कळीचा मुद्दा बनला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद बहुजन समाजाचे नेते सुभाष शिरोडकर यांच्याकडे सोपवण्यात आले असले तरी संघटनात्मक पातळीवर त्यांचा अजिबात प्रभाव दिसून येत नसल्याने या समाजाचेच घटक नाखूष आहेत. पक्षाचे सरचिटणीस विष्णू वाघ यांनी भाषा माध्यम प्रश्नावरून घेतलेली आक्रमक भूमिका व कॉंग्रेस पक्षाचा त्याग करण्याची केलेली घोषणा कॉंग्रेसच्या ‘ओबीसी’ मतपेढीवर निश्चितच परिणाम करणारी ठरेल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
भाजपकडील ‘ओबीसी’ नेत्यांचा भरणा जास्त असल्याने या घटकावर भाजपचा प्रभाव वाढत चालला आहे. कॉंग्रेस पक्षाची या घटकावरील पकड मात्र ढिली पडल्याची संधी साधून आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने त्यात घुसखोरी करण्याचे ठरवले आहे. बहुजन समाजाचा बहुतांश प्रभाव हा उत्तर गोव्यात असल्याने या मतदारसंघांची जबाबदारी सुरेश परूळेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. जास्तीत जास्त ‘ओबीसी’ नेत्यांना उमेदवारीचे आमिष दाखवून आपल्या कळपात ओढण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीने आखले आहेत. या घटकाला एकसंध करण्यासाठी २७ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुढे करण्याचेही राष्ट्रवादीत घाटत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
Friday, 17 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment