भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे सतर्कतेचे आवाहन
पणजी, दि. १६ : पालकांनी कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना, आमिषांना, दबावाला व दडपशाहीला बळी न पडता खंबीरपणे कोकणी-मराठी व अन्य भारतीय भाषिक शाळांतून माध्यम बदलाला कोणत्याही परिस्थितीत संमती देऊ नये. तसेच कोर्या पत्रकावर अंगठा किंवा सही करू नये, असे सतर्कतेचे आवाहन माध्यम परिपत्रकावरून भारतीय भाषा सुरक्षा मंचातर्फे गोव्यातील समस्त मातृभाषाप्रेमी पालकांना करण्यात आले आहे.
भारतीय भाषा सुरक्षा मंचाने गोमंतकातील सर्व प्राथमिक शाळांतील पालक व शिक्षकांना आवाहन करताना म्हटले आहे की, गोवा सरकारच्या शिक्षण खात्यातर्फे अलीकडेच शिक्षण माध्यम संदर्भात एक परिपत्रक काढण्यात आले आहे. या द्वारे शाळेच्या माध्यम बदलाबाबत २३ जून २०११ पर्यंत पालकांकडून एक संमती पत्र लिहून घेण्याबाबत सर्व शाळांना कळविण्यात आले आहे. हे परिपत्रक भारतीय भाषा, संस्कृती व अस्मिता नष्ट करणारे असून गोव्यावर दूरगामी व अनिष्ट परिणाम करणारे आहे.
मंचाच्या कार्यकर्त्यांनी असे आढळून आले आहे की राजकीय नेते व त्यांचे कार्यकर्ते शाळांना भेटी देऊन अशा प्रकारची संमती पत्रे बळजबरीने भरून घेत आहेत. तसेच काही विशिष्ट व्यवस्थापन मंडळे जबरदस्तीने मुलांना शाळेतून काढून टाकण्याच्या धमक्या देऊन पालकांकडूनइंग्रजी माध्यमासाठी संमती पत्रे भरून घेत असल्याच्या तक्रारी मंचाकडे आले असल्याचेही मंचाने नमूद केले आहे.
गोवा सरकारच्या या चुकीच्या निर्णयामुळे इंग्रजीकरणातून संस्कृती उध्वस्त होण्याचे मोठे संकट येऊ घातले आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन गोव्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी वरिष्ठांच्या, व्यवस्थापनाच्या व राजकीय नेत्यांच्या कोणत्याही दडपणाला बळी न पडता योग्य ती काळजी घेऊन पालकांना भारतीय भाषांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ते मार्गदर्शन करावे व यात कोणत्याही अडचणी व दडपण येत असल्यास मंचाच्या कार्यकर्त्यांकडे संपर्क साधावा, असे आवाहनही मंचाच्या निमंत्रक श्रीमती शशिकला काकोडकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.
Friday, 17 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment