Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 12 June 2011

पणजीत ठिकठिकाणी पाणी तुंबले वाहनचालक व पादचार्‍यांची तारांबळ

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): ‘नेमेचि येतो मग पावसाळा,’ या उक्तीनुसार वरुणराजाचे आगमन होताच आणि राजधानी पणजीत ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचण्याचे प्रकार दरवर्षी होतात. यंदाही तेच दारुण आणि करुण चित्र दिसत आहे. त्यामुळे महत्त्वाच्या रस्त्यांशेजारी अनेक ठिकाणी गढूळ पाणी व कचरा साठून वाहन चालक व पादचार्‍यांसाठी हा प्रकार कमालीचा त्रासदायक ठरत चालला आहे.
पणजी महापालिका पावसाळ्याच्या तोंडावर पावसाचे पाणी तुंबू नये म्हणून विविध कामे केल्याचा जोरदार दावा करत आहे. मात्र शहरातील विविध भागातील रस्ते भर पावसात गढूळ पाण्याने भरून राहण्याचे प्रकार वाढल्यामुळे महापालिकेचा दावा फोल ठरल्याचे स्पष्ट होत आहे. वाहनचालकांना गढूळ पाण्यातून वाहन चालवावे लागत असून पादचार्‍यांना गढूळ पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे. चार दिवसापूर्वी पणजीतील मळा भागातील घरामध्ये पावसाचे पाणी घुसले होते. पणजी बसस्थानकाजवळील कोकणी अकादमीसमोर तर दरवर्षी पाणी साचते. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडतो. कांपाल, पाटो परिसर आदी भागात यंदा ठिकठिकाणी पाणी साचले असून या घाण पाण्यातच वाहणे पार्किंग करावी लागतात. त्यामुळे महापालिकेने तुंबणारे पाणी हटाव मोहीम राबवण्याची गरज व्यक्त होत आहे. आपल्या हाती महापालिकेची सूत्रे येताच पणजीला शिस्त लावण्याचे मोठी आश्‍वासने ताळगावतील ‘बिग बॉस’च्या पॅनेलने दिली होती. प्रत्यक्षात ती फक्त कागदावरच उरली आहेत, असे लोकांचे म्हणणे आहे.

No comments: