Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 17 June, 2011

जादूई हातांचा गोपाळ कुडासकर

पणजी, दि. १६ (विठ्ठल पारवाडकर): मडगाव येथील रवींद्र भवनात प्रवेश करताच सर्वांचे मन आकर्षून घेते ते प्रवेशद्वारावर केलेले ‘म्युरल टेरेकोटा’ मातीचे नक्षीकाम. अतिशय रेखीव व मनमोहक आणि गोव्याच्या परंपरागत शिल्पकलेचा नमुना ठरलेले हे नक्षीकाम ज्या कल्पक हातांतून साकारले आहे ते हात आहेत शिल्पकार गोपाळ उत्तम कुडासकर यांचे! डिचोली कुंभारवाडा येथील अनेक हस्तकारागीरांपैकी एक असलेला हा युवा शिल्पकार गोव्यातील अनेक प्रसिद्ध शिल्पांचा निर्माता आहे. मातीपासून केलेल्या वस्तूंच्या कौशल्यामुळे नावारूपाला आलेला गोपाळ आज फायबर ग्लासची उत्कृष्ट शिल्पे बनवणारा ‘मास्टर’ ठरला आहे. पणजी येथील श्रमशक्ती भवन इमारतीतील कला आणि संस्कृती खात्याच्या प्रवेशद्वारावर ठेवण्यात आलेला घोडेमोडणी कलाकार व सोबतची सुंदर स्त्री गोपाळच्या हातात असलेल्या जादूची झलक दर्शवण्यास पुरेसे आहे.
आल्तिनो पणजी येथील गोवा कला महाविद्यालयात ‘व्हिजिटिंग लेक्चरर’ म्हणून काम करणारा, फाईन आर्ट पदवीधारक गोपाळ आपल्या व एकूणच शिल्पकलेबद्दल मनमुरादपणे बोलला. तो म्हणाला की, गोव्यात शिल्पकलेचे चाहते अनेक असून बदलत्या काळानुसार शिल्पासाठी वापरण्यात येणार्‍या मातीची जागा आता फायबर ग्लासने घेतली आहे. फायबर ग्लासची कलाकृती मातीपेक्षा जास्त काळ टिकत असल्याने लोकांची या प्रकारातील शिल्पांना अधिक मागणी आहे. आपण मातीच्या शिल्पाबरोबरच ‘टेरेकोटा’, ‘सिमेंट’, ‘प्लास्टर ऑफ पॅरीस’ व ‘फायबर ग्लास’ पासून शिल्पे बनवत असल्याचे त्यांनी सांगितले. फायबर ग्लासपासून बनवलेली आपली शिल्पे सरकारच्या विविध आस्थापनांसोबतच अनेक पंचतारांकित हॉटेलांच्या दालनातही ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
फायबर ग्लासची शिल्पे तयार करण्यासाठी कच्चा माल पणजी व बेती येथे उपलब्ध आहे. मच्छीमार लोक होड्या बनवण्यासाठी फायबर ग्लासचा उपयोग करतात. त्यामुळे कच्च्या मालाला कमतरता नाही, असे ते म्हणाले.
लहान मोठी स्मृतिचिन्हे बनवून देण्याबरोबरच कला आणि संस्कृती खात्याच्या विविध ऑर्डर पुरवण्याचे काम नोकरी संभाळून गोपाळ करत असून आज त्याने आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकाची लहान प्रतिकृती बनवून आणली होती. असा हा गोव्याचा युवा कलाकार आपल्या शिल्पकलेद्वारे आगामी काळात अधिकच नावलौकिक मिळवील यात तिळमात्र शंका नाही.

No comments: