बाळ्ळीप्रकरणी केपे आमदारांवर ‘उटा’चा थेट आरोप
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): बाळ्ळी येथे ‘उटा’ आंदोलनावेळी झालेली दोन कार्यकर्त्यांची हत्या ही सरकार पुरस्कृतच आहे. आत्ताही सरकारच आरोपींना वाचवण्यासाठी धडपडत असून केपेचे आमदार बाबू कवळेकर यांचा दूरध्वनी ताब्यात घेऊन ‘उटा’ आंदोलनाच्या दिवशी त्यांनी कुणाकुणाला फोन केले होते व त्यांना कुणाचे फोन आले होते याची सखोल चौकशी झाल्यास सदर हत्याकांडाबद्दल व हिंसाचाराबद्दल बरीच माहिती बाहेर येईल, असे प्रतिपादन ‘उटा’चे निमंत्रक प्रकाश वेळीप व पैंगीणचे आमदार रमेश तवडकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. यावेळी कार्याध्यक्ष नामदेव फातर्पेकर उपस्थित होते.
२३ दिवसांपूर्वी दिलेले आश्वासन मुख्यमंत्री विसरले आहेत. त्यामुळे आजही ‘उटा’वरील अन्यायाबाबत न्यायालयीन चौकशी करण्याबाबत सरकार उदासीन आहे. सदर जळीतकांडातील आरोपींविरुद्धचे पुरावे नष्ट करता यावेत, यासाठीच सरकारचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
आज पत्रकार परिषदेत ‘उटा’च्या नेत्यांनी पहिल्यांदाच बाळ्ळी प्रकरणी केपेच्या आमदारांवर थेट आरोप केला व त्यांच्या चौकशीची मागणी केली. या वेळी बोलताना माजी मंत्री प्रकाश वेळीप म्हणाले की, आंदोलनाच्या दुसर्याच दिवशी बाबू कवळेकर यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव व ‘उटा’चे एक नेते प्रकाश अर्जुन वेळीप यांच्यावर अनावश्यक आरोप केले होते. तसेच या प्रकरणी आत्तापर्यंत अटक केलेले आरोपी हे बाबू कवळेकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यामुळे या प्रकरणी सरकार पुरावे नष्ट होण्याची वाट पाहत असून जळीतकांड स्थळीचे पुरावे शोधण्याची तसदी सरकारने अजून घेतलेली नाही. मंगेश गावकर याचे जळालेले शव ज्या ठिकाणी मिळाले होते तेथेच त्याचे पाकीट व मोबाईल सापडला असून दिलीप वेळीप याचा मृतदेह संडासात सापडला होता. यावरून आरोपींनी पोलिसांच्या साहाय्यानेच वरील दोघांना जाळून मारल्याचे सिद्ध होत आहे, असे प्रकाश वेळीप म्हणाले.
केवळ काही संशयितांना अटक करण्याचे नाटक करून सरकार धूळफेक करत आहे. आठ दिवसांच्या आत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे न्यायालयीन चौकशी सुरू करून इतर मागण्यांवरही कार्यवाही करावी; अन्यथा ‘उटा’ला पुढील पाऊल उचलावे लागेल, असा इशारा यावेळी आमदार रमेश तवडकर यांनी दिला. जिल्हाधिकार्यांनी केलेल्या चौकशीबाबत ‘उटा’ समाधानी नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज्यपालांना निवेदन सादर
दरम्यान, आज संध्याकाळी ‘उटा’च्या नेत्यांनी गोव्याचे राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले व बाळ्ळी जळीतकांडासारख्या गंभीर प्रकरणाची त्वरित चौकशी करण्यास राज्य सरकारला भाग पाडावे अशी मागणी केली.
Saturday, 18 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment