Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 12 June 2011

परिपत्रक मागे न घ्याल तर खबरदार

भाषा मंचचा सरकारला झणझणीत इशारा
इंग्रजी माध्यम परिपत्रकाची पणजीत होळी

पणजी, दि.११ (प्रतिनिधी): इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान देण्याविषयी घिसाडघाईने परिपत्रक काढून दिगंबर कामत सरकारने लोकांच्या उद्रेकात भर घातली आहे. सरकारने हे परिपत्रक ताबडतोब मागे घ्यावे; नपेक्षा लोकांच्या रोषाचा सामना सरकारला करावा लागेल, असे खणखणीत प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या निमंत्रक शशिकलाताई काकोडकर यांनी आज येथे केले. शिक्षण खात्याने काल म्हणजे दि.१० रोजी काढलेल्या या परिपत्रकामुळे खवळलेल्या भाषा सुरक्षा मंचतर्फे आज आझाद मैदानावर परिपत्रकाच्या प्रतीची जाहीर होळी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाषाप्रेमी उपस्थित होते.
शशिकला काकोडकर म्हणाल्या, सरकारला लोकभावनांची कदर करून माध्यमप्रश्‍नी माघार घ्यावीच लागेल. जोपर्यंत सरकार माघार घेत नाही तोपर्यंत भाषा सुरक्षा मंचचा लढा सुरूच राहणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या सरकारी परिपत्रकाची होळी करण्यात येणार आहे.
संयोजक प्रा. सुभाष वेलींगकर म्हणाले, गोव्यातील कॉंग्रेस सरकार लोकशाहीच्या नावाखाली व सत्तेच्या जोरावर लोकभावनांची कदर न करता देशविरोधी कृत्य करत असून भाषाप्रेमींच्या संतापाचा सामना आता सरकारला करावा लागेल.
प्रा. सुभाष देसाई म्हणाले, इंग्रजी माध्यमाला विरोध आहे असे सत्ताधारी पक्षातील काही आमदार सांगतात. मात्र सरकारने परिपत्रक काढल्यामुळे सदर आमदारांचा खोटारडेपणा सिद्ध झाला आहे. सरकारने घाईगडबडीत काढलेले परिपत्रक म्हणजे स्थानिक भाषांची मृत्यूघंटाच ठरावी.
अन्य मान्यवरांचीही याप्रसंगी दिगंबर कामत सरकारचा निषेध करणारी भाषणे झाली. यावेळी सरकारविरोधी जोरदार घोषणा देऊन भाषाप्रेमींनी सारा परिसर दणाणून सोडला आणि इंग्रजी माध्यम परिपत्रकाच्या प्रतीची होळी केली.

No comments: