Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 15 June, 2011

घातकी राज्यकर्त्यांना हद्दपार करा!

भारतीय भाषा सुरक्षा मंचाने फुंकले रणशिंग
गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सवी समितीचे
सदस्यत्व सोडल्याची नेत्यांची घोषणा

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): भाषा माध्यमप्रश्‍नी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची कृती अत्यंत घातक अशीच आहे. विद्यमान सरकारचे काही धोरणात्मक निर्णय राज्यासाठी धोकादायक ठरणारे असल्याने एव्हानाच जनतेत जागृती करून या शक्तींना राजकारणातून कायमचे हद्दपार करण्याची ही योग्य वेळ आहे आणि त्यासाठी भारतीय भाषा सुरक्षा मंच पुढाकार घेईल, अशी घोषणा आज करण्यात आली.
आज येथेे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत मंचाचे नेते ऍड. उदय भेंब्रे यांनी ही माहिती दिली. यावेळी मंचाच्या निमंत्रक शशिकलाताई काकोडकर व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली हजर होते. राज्य सरकारने गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सवी वर्ष सल्लागार समितीची स्थापना केली होती. सुवर्णमहोत्सवी वर्षाचे सहा महिने उलटले तरी या समितीची केवळ एक बैठक झाली व या बैठकीला मोजक्याच सदस्यांची उपस्थिती लाभली. दिगंबर कामत अ-सांस्कृतिक व अ-राष्ट्रीय विचारांच्या लोकांना शरण गेल्यानेच त्यांना गोवा मुक्तीचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याचेही भान राहिलेले नाही, असा जबर टोलाही ऍड. भेंब्रे यांनी हाणला.
प्राथमिक माध्यम इंग्रजी करून कॉंग्रेस सरकारने राज्यावर इंग्रजी वसाहतवाद लादण्याचा निर्णय घेतल्याने या सरकारला गोवा मुक्तीचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याचा कोणताच नैतिक अधिकार राहिलेला नाही. अशा सरकारच्या समितीत राहणेच मुळी आपल्या राष्ट्रीयत्वाची मानहानी ठरणार असल्याने या समितीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. या समितीतून शशिकला काकोडकर, उदय भेंब्रे व नागेश करमली यांनी बाहेर पडत असल्याचा निर्णय यावेळी जाहीर केला.
गोवा विधानसभेच्या ४० सदस्यांपैकी फक्त १० सदस्यांचा पाठिंबा इंग्रजीकरणाला आहे व तरीही हा निर्णय लोकांवर लादला जात आहे ही लोकशाहीची थट्टा असल्याचा आरोप ऍड. उदय भेंब्रे यांनी केला. सुरुवातीला पोर्तुगिजांनी इथल्या लोकांचे धर्मांतर करून आपली संस्कृती रुजविण्याचा घाट घातला व आता मुक्त गोव्यात पोर्तुगीज भूत मानगुटीवर बसलेल्या कॉंग्रेसने इथल्या लोकांच्या संस्कृतीचे इंग्रजीकरण करण्याचा विडा उचलला आहे. बालवयातच इंग्रजीचा मारा भावी पिढीवर केल्यास भविष्यात आपली मातृभाषा व संस्कृतीच्या विरोधातच ही पिढी पुढे सरसावेल व त्यातून आपले राष्ट्रीयत्वच धोक्यात येईल, अशी भीतीही ऍड. उदय भेंब्रे यांनी व्यक्त केली. १८ जूनची मुदत सरकारला देण्यात आली आहे व त्यामुळे ही मुदत संपताच हे आंदोलन अधिक आक्रमक केले जाणार आहे. सरकारने जारी केलेल्या परिपत्रकाबाबत मंचाच्या कायदा विभागाचा अभ्यास सुरू असल्याचे संकेतही यावेळी श्रीमती काकोडकर यांनी दिले.
--------------------------------------------------------
पुरस्कार, समित्यांवरील
पदांचा भेंब्रेंकडून त्याग

कधी काळी कॉंग्रेसच्या विचारसमुहाचे पुढारी असलेले ऍड. उदय भेंब्रे भाषाप्रश्‍नी कॉंग्रेसवर बरेच नाखूष बनले आहेत व त्यामुळे त्यांनी या सरकारच्या कार्यकाळात मिळालेले सर्व पुरस्कार तथा विविध सरकारी समित्यांवरील पदांचा त्याग करण्याची घोषणा केली आहे. शशिकला काकोडकर व नागेश करमली यांनीही सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ सुवर्णमहोत्सवी समितीचा राजीनामा दिला आहे.
२००७-८ यावर्षी मिळालेला राज्य सांस्कृतिक पुरस्कार, गोवा कोकणी अकादमीतर्फे देण्यात आलेला शणै गोंयबाब कोकणी भाषा सेवा पुरस्कार हे सरकारला परत करणार असल्याचे भेंब्रे म्हणाले. याबरोबरच सुवर्णमहोत्सवी वर्ष महोत्सव समितीचे सदस्यत्व, राजभाषा संचालनालयाच्या कोकणी परिभाषा समितीचे अध्यक्षपद तथा सदस्यत्व व कला अकादमीच्या सर्वसाधारण मंडळाच्या सदस्यत्वाचा त्याग करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

No comments: