Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 17 June, 2011

‘त्या’ आहाराचे नमुने प्रयोगशाळेत

ऊर्मीला साळगावकर अद्याप फरार, सर्व विद्यार्थी सुखरूप
पणजी व वास्को, दि. १६ (प्रतिनिधी): वास्को येथे माध्यान्ह आहारातून विषबाधा झाल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने सरस्वती व गौरी महिला मंडळाचे परवाने निलंबित केले आहेत. या आहाराचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्यात दोष आढळल्यास हे परवाने रद्द करण्यात येतील, अशी माहिती संचालक सलीम वेलजी यांनी दिली. दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची शिफारसही करणार असल्याचे ते म्हणाले.
वास्को येथील मुरगाव हायस्कूल व श्री सुशेनाश्रम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहारातून झालेल्या विषबाधेची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. या दोन्ही विद्यालयांना हा आहार पुरवणार्‍या सरस्वती महिला मंडळाचा यापूर्वी अशाच कारणासाठी परवाना निलंबित करण्यात आला होता. परंतु, तो नंतर परत देण्यात आला. याप्रकरणी श्री. वेलजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व अटींची पूर्तता त्यांनी केल्याने तसेच त्यांच्याकडून पुरवण्यात येणार्‍या आहाराची चाचणी करूनच या परवान्याचे नूतनीकरण करण्यात आले.
ऊर्मीला साळगावकर अद्याप फरार!
सरस्वती महिला मंडळाच्या प्रमुख ऊर्मीला साळगावकर अजूनही फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर, मंडळाचा आचारी सदाशिव पुजारी याला आज न्यायालयात उपस्थित केले असता त्याला एका दिवसाची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. दरम्यान, विषबाधा झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता ठीक असून आज संध्याकाळपर्यंत सर्वांना घरी जाऊ देण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
सदर मंडळाच्या स्वयंपाकघराला आज अचानक भेट दिलेल्या आरोग्य खात्याच्या डॉ. कुवेलकर यांनी ते स्वयंपाकघर बंद असल्याचे सांगितले. मात्र, त्याच्या आसपासचा परिसर अत्यंत गलिच्छ असल्याचे ते म्हणाले. यापुढे येथे आहार पुरवणार्‍या विविध मंडळांना अचानक भेटी दिल्या जातील अशी माहितीही त्यांनी दिली.

No comments: