पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा नोंद असलेल्या मुश्ताकीन नदाफ रझाक (२२) याने आज बाल न्यायालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला खरा; परंतु रात्री हणजूण पोलिसांच्या तावडीत तो सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला.
मुश्ताक या नेपाळी युवकाला हणजूण येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी मुंबईत अटक करून आणले होते. हे अपहरण प्रेमप्रकरणातून घडले होते पण सदर मुलगी अल्पवयीन असल्याने त्याच्यावर गुन्हा नोंद झाला होता. पोलिस हवालदार दिनेश कानोळकर, शिपाई कमलेश सावंत व महादेव मोरजे यांनी रझाक व अन्य एका आरोपीला सडा तुरूंगातून आज बाल न्यायालयात सुनावणीसाठी आणले होते. रझाक याने शौचालयात जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला शौचालयात पाठवून एक शिपाई बाहेर पहारा देत उभा होता. मात्र शौचालयातूनच त्याने पळ काढला. दरम्यान, रझाक पळ काढून पुन्हा हणजूण येथे त्या मुलीला भेटण्यासाठी गेला असता त्याला हणजूण पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. पणजी पोलिसांनी रझाक याच्यावर पळ काढल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस अधीक्षक डी. के. सावंत यांनी अहवाल मागितला आहे.
Saturday, 18 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment