म्हापसा पाण्याखाली - अन्य भागांतही पावसाचे थैमान
म्हापसा, दि. १७ (प्रतिनिधी): काल रात्रीपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाने राज्यातील जनजीवन विस्कळीत केले आहे. कुंकळ्ळी, केपे, पेडणे, वाळपई, माशेल या भागांत पावसाने थैमान घातले असून म्हापशात तर साक्षात जलप्रकोपच झाला आहे. ठिकठिकाणी पाणी साचून राहिल्याने म्हापसा शहर पाण्याखाली गेले असून त्यामुळे प्रचंड समस्या निर्माण झाली आहे.
आज सकाळी पाचच्या सुमारास येथील जनता हायस्कूलसमोरील सेंट मेरी हायस्कूलच्या मागील दरड व गुलमोहराचे झाड कोसळल्याने चार वीजखांब पडले. झाड गोम्स कातांव इमारतीतील एका फ्लॅटवर पडल्याने तेथे नुकसान झाले. सकाळी १०.३० वाजता लक्ष्मी इमारतीतील पहिल्या मजल्यावर राहणार्या रोहीदास च्यारी यांच्या फ्लॅटवर दरडीबरोबर भला मोठा दगड येऊन आदळल्याने फ्लॅटच्या भिंतीचे मोठे नुकसान झाले तर खाली ठेवलेल्या एका स्कूटरचा चुराडा झाला. दरड कोसळल्याने सेंट मेरी हायस्कूलच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. म्हापसा उपजिल्हाधिकारी दशरथ रेडकर यांनी येथे येऊन पाहणी केली.
शहरात पूरसदृश्य स्थिती
दरम्यान, अविरत पडणार्या पावसाने संपूर्ण म्हापसा शहरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. आज शुक्रवारचा बाजार असल्याने विक्रेत्यांनी आपापली दुकाने थाटण्याचा प्रयत्न केला. परंतु, पावसाच्या धारांनी येथे ठेवलेले विविध जिन्नस अक्षरशः वाहून जातानाचे चित्र दिसत होते. पावसाच्या धारांत चिंब झालेल्या काहींनी बाजारहाट करण्याचा प्रयत्न केला तर अनेकांनी परतीचा रस्ता धरला. खोर्ली, बोडगेश्वर मंदिरासमोरील परिसर व करासवाड्यात सर्वत्र पाणी साचून त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
कळंगुट, नागवा, हडफडे येथील अनेक भागांतही पाणी रस्त्यावरून वाहत होते. पावसाच्या तडाख्याने थिवी, पीर्ण, कान्साबोर्ड चर्चजवळ, वागातोरात झाडे उन्मळून पडली. कळंगुट, नेरूल, बागा, पर्वरी या ठिकाणीही झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.
Saturday, 18 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment