Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 2 July 2011

प्रदेश कॉंग्रेस समितीकडूनही आता इंग्रजीकरणाचे समर्थन

पणजी, दि. १ (प्रतिनिधी): प्राथमिक शिक्षण माध्यमप्रश्‍नी सरकार पाठोपाठ आता प्रदेश कॉंग्रेस समितीनेही आपली इंग्रजी समर्थनार्थ भूमिका जाहीर केली आहे. इंग्रजी प्राथमिक माध्यमाला मान्यता देण्याच्या सरकारच्या निर्णयाचे जोरदार स्वागत करून या निर्णयाची अंमलबजावणी यंदाच्या शैक्षणिक वर्षांत करण्यासाठी सरकारच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. दरम्यान, पाळीचे आमदार प्रताप गावस वगळता एकही आमदार या बैठकीला फिरकला नाही हे विशेष!
बर्‍याच कालावधीनंतर प्रदेश कॉंग्रेस समितीची आज कॉंग्रेस भवनात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला अनेक पदाधिकार्‍यांनी हजेरी लावली खरी, परंतु मातृभाषेचे समर्थन करणार्‍या पदाधिकार्‍यांनी मात्र गैरहजर राहून आपला निषेध नोंदवला. भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणारे पाळीचे आमदार प्रताप गावस व कांता गावडे आदींनी या निर्णयाला मुकाट्याने दिलेली संमती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. या बैठकीनंतर पत्रकारांना संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
परिपत्रकातील त्रुटी ही सामान्य बाब
शिक्षण खात्याने जारी केलेल्या परिपत्रकातील त्रुटी ही सामान्य बाब आहे. कोणताही निर्णय सुरुवातीला परिपूर्ण असत नाही. परंतु, कालांतराने त्यातील त्रुटी आढळून आल्यानंतर त्या दूर करणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचेही ते म्हणाले. शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात हे हा विषय व्यवस्थितपणे हाताळत असल्याची स्तुतिसुमनेही त्यांनी उधळली. पालकांना प्राथमिक माध्यम निवडण्याचे स्वातंत्र्य देण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयासंबंधी करण्यात येत असलेल्या अपप्रचाराचा समाचार घेण्यासाठी कॉंग्रेस पक्षातर्फे ठिकठिकाणी बैठका आयोजित करून लोकांत जागृती करण्यात येणार असल्याचेही श्री. शिरोडकर म्हणाले. पक्षाचे माजी सरचिटणीस विष्णू वाघ यांच्यावर कारवाई करणार काय, असा सवाल केला असता तो निर्णय श्रेष्ठींना घ्यावयाचा आहे, असेही ते म्हणाले. कॉंग्रेसच्या विचार विभागाची नव्याने पुनर्रचना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ आहे व त्यामुळे इंग्रजीचे महत्त्व कुणीही नाकारू शकत नाही. गोव्याची अस्मिता, संस्कृती नष्ट होईल ही बडबड वायफळ आहे. प्राथमिक स्तरावर शाळेपेक्षा पालकांकडूनच मुलांवर अधिक संस्कार केले जातात, अशी मल्लिनाथीही त्यांनी केली. एका वर्गात एखादा विद्यार्थी जरी मातृभाषेतून शिकण्याची इच्छा व्यक्त करीत असेल, तर त्याची सोय करण्याची तरतूद या परिपत्रकात असावी, असेही ते म्हणाले.
अल्पसंख्याक आयोग व महामंडळाचा प्रस्ताव
राज्यातील अल्पसंख्याकांसाठी वेगळा आयोग व वित्त महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव सरकारला पाठवण्यात येणार असल्याचे श्री. शिरोडकर म्हणाले. या संस्थांकरवी अल्पसंख्याकांसाठी विविध योजना तथा आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे.
‘त्या’ मंत्र्यांच्या बरळण्याला प्रसिद्धी नको..
कॉंग्रेस पक्षात उमेदवारांची घोषणा करण्याचा अधिकार फक्त श्रेष्ठींना आहे व त्यासाठी एक कायदेशीर प्रक्रिया असते. इथे जे मंत्री उमेदवारांची घोषणा करतात त्याला काहीच अर्थ नसून अशा बरळणार्‍यांना अजिबात प्रसिद्धी देऊ नका, असे आवाहन सुभाष शिरोडकर यांनी केले. मंत्र्यांकडून होणार्‍या या घोषणांना अजिबात महत्त्व नसून त्यांनी अशा पद्धतीची घोषणाबाजी बंद करावी, असेही ते म्हणाले.
-------------------------------------------------------------------
‘एसटीं’साठी पाच मतदारसंघ?
राज्यातील अनुसूचित जमातींसाठी १२ टक्क्यांनुसार विधानसभेचे पाच मतदारसंघ राखीव ठेवण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करणार असल्याची घोषणा श्री. शिरोडकर यांनी केली. या प्रकरणी लवकरच प्रदेश कॉंग्रेस व विधिमंडळ गटाचे शिष्टमंडळ दिल्लीला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीवेळी ‘उटा’चे कार्यकर्ते मंगेश गावकर व दिलीप वेळीप यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अनुसूचित जमातीच्या बहुतांश मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. या जमातीसाठी राखीव सरकारी पदे सहा महिन्यांच्या कार्यकाळात भरण्यासाठी प्रदेश कॉंग्रेस पुढाकार घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

No comments: