शिवोलीत परिपत्रकाची होळी
म्हापसा, दि. १ (प्रतिनिधी): कॉंग्रेस सरकारने माध्यम प्रश्न निर्माण करून शांत अशा गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडण्यास प्रोत्साहन दिले आहे. मूठभर मंत्र्यांच्या दबावाला बळी पडून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मातृभाषांचा गळा घोटण्याचे दुष्कर्म केले आहे. कॉंग्रेस सरकार गोेमंतकीय संस्कृतीच्या मुळावरच उठल्याने या सरकारला येत्या निवडणुकीत खाली खेचणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर यांनी केले.
आज शिवोली येथे मातृभाषाप्रेमींनी आयोजित केलेल्या एका निषेध कार्यक्रमात सरकारने जारी केलेल्या बेकायदा परिपत्रकाची होळी करण्यात आली. त्यावेळी आमदार मांद्रेकर बोलत होते. दिगंबर कामत सरकारने घेतलेला निर्णय गोमंतकीयांना मान्य नाही. या निर्णयाविरोधात संपूर्ण राज्यभर असंतोषाचा वणवा पेटला आहे. परंतु, तरीही कॉंग्रेस सरकार माघार घेण्यास तयार नाही. अशा या असंवेदनशील सरकारला खाली खेचून गोव्याच्या संस्कृतीचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक गोमंतकीयांच्या खांद्यावर आलेली आहे, असेही ते म्हणाले.
या निषेध सभेला शिवोलीतील भाजप कार्यकर्ते पंढरीनाथ पोळे, रामा परब, प्रताप वेर्णेकर, पंच सविता गोवेकर, जिल्हा पंचायत सदस्य मनोज कोरगावकर, रामेश्वर मांद्रेकर तसेच प्रसिद्ध चित्रकार संजय हरमलकर यांची उपस्थिती होती. श्री. हरमलकर यांनी यावेळी कॉंग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयावर घणाघाती टीका केली.
Saturday, 2 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment