- चौपदरीकरणासाठी कारवाई
- कुटुंबांचे सडा येथे पुनर्वसन
वास्को, दि. ३० (प्रतिनिधी): वेर्णा ते एमपीटीमहामार्गाच्या चौपदरीकरणाआड येणारी काटे - बायणा, वास्को येथील ९८ घरे आज कडक सुरक्षा बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आली. या घरांत राहत असलेल्या कुटुंबांचे सडा येथे पुनर्वसन करण्यात आले असून येत्या काही दिवसांत उर्वरित २८ घरेही पाडण्यात येणार आहेत. त्यांतील १२ मच्छीमार कुटुंबांचे जोशीभाट येथे पुनर्वसन करण्यात येईल तर १६ कुटुंबांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
आज सकाळी दहा वाजल्यापासून बायणा येथील आंबेडकर स्पोर्टस् इमारतीकडून या घरांवरील कारवाईला सुरुवात झाली. कारवाईदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून येथे सुमारे ३०० सुरक्षा जवान तैनात करण्यात आले होते. पाच ‘जेसीबी’ मशीन व दक्षिण गोवा बेकायदा बांधकाम विभागाच्या पन्नास कर्मचार्यांनी संध्याकाळी ५.३० पर्यंत ही घरे जमीनदोस्त केली. दरम्यान, पाडण्यात आलेल्या घरांत राहणार्या कुटुंबांचे सडा येथील पुनर्वसन महामंडळाच्या इमारतीत स्थलांतर करण्यात आल्याची माहिती मुरगाव उपजिल्हाधिकारी लेविन्सन मार्टीन्स यांनी दिली. आगामी काळात उर्वरित २८ घरे पाडली जातील. यातील १२ घरे मच्छीमार बांधवांची असून त्यांचे जोशीभाट येथे पुनर्वसन केले जाईल; अन्य १६ कुटुंबांनीही आपण मच्छीमार व्यवसायात असल्याचा दावा केला असल्याने ती तूर्तास वाचली आहेत. त्यांचे पुनर्वसन केले जाणार ही नाही याबाबत सरकारी पातळीवर निर्णय होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आजच्या या कारवाईवेळी दक्षिण गोवा बेकायदा बांधकाम पथकाचे जिल्हाधिकारी जॉन्सन मार्टीन्स यांच्यासोबत अतिरिक्त जिल्हाधिकारी नारायण सावंत, गोवा पुनर्वसन विभागाचे पंढरीनाथ नाईक, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक ऍलन डीसा, केपे मामलेदार सुदिन नातू, मुरगाव उपअधीक्षक महेश गावकर, वेर्णा पोलिस निरीक्षक राजन निगळे, निरीक्षक सागर एकोस्कर तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. अग्निशामक दलही तैनात करण्यात आले होते.
Friday, 1 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment