शशिकला काकोडकरांचा कॉंग्रेसला इशारा
पणजी, दि. २८ : गोवा सरकारने माध्यम प्रश्नावरील आपली अप्रामाणिक आणि घटनाविरोधी कृती त्वरित थांबवावी आणि गेल्या अनेक दशकांपासून कोकणी आणि मराठी माध्यमातील प्राथमिक शाळांनाच अनुदान देण्याची पद्धती कायम ठेवावी, अशी मागणी भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या निमंत्रक श्रीमती शशिकला काकोडकर यांनी केली आहे.
शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी माध्यमासंबंधात देखरेख समितीने काढलेल्या परिपत्रकातील त्रुटी मंत्रिमंडळासमोर ठेवल्या जातील असे वक्तव्य काल केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना श्रीमती काकोडकर यांनी सांगितले की, देखरेख समितीला परिपत्रकातील त्रुटी काढणे भाग पडले कारण हे परिपत्रक आणि धोरणासंबंधीचा प्रस्ताव खात्यातर्ङ्गे तयार करण्यात आलाच नव्हता. प्रक्रियेनुसार कोणत्याही खात्याच्या अधिकार्याने स्वतःच्या खात्यानेच जारी केलेल्या परिपत्रकातील चुका काढणे हे हास्यास्पद व अतिशय चुकीचे आहे. प्रशासनाशी संबंध नसलेल्याने हा प्रस्ताव तयार केला तरच खात्याचे अधिकारी त्यातील चुका काढू शकतात, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.
ढोंगी मंत्री, आमदारांना इशारा!
मंत्री रवी नाईक, सुदिन ढवळीकर, बाबू आजगावकर, विश्वजित राणे, नीळकंठ हळर्णकर त्याचप्रमाणे आमदार बाबू कवळेकर, पांडुरंग मडकईकर, प्रताप गावस, दीपक ढवळीकर आणि श्याम सातार्डेकर यांनी माध्यमप्रश्नी घेतलेल्या दांभिक भूमिकेवरही श्रीमती काकोडकर यांनी आसूड ओढले आहेत. सरकारच्या माध्यम निर्णयास विरोध असल्याचे भासवणारे सदर मंत्री व आमदार स्वार्थासाठी आपल्या पदांना चिकटून बसले आहेत. या सर्वांनी आपापल्या पदांचे त्वरित राजीनामे न दिल्यास त्याचे गंभीर राजकीय परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला आहे.
राज्यातील कॉंग्रेसप्रणित आघाडी सरकार कोकणी आणि मराठी प्राथमिक शाळांना संरक्षण आणि प्रोत्साहन देण्यास सपशेल अयशस्वीच ठरलेले नाही, तर राज्य सरकारचा निधी सध्या अस्तित्वात असलेल्या प्राथमिक शाळांत इंग्रजी वर्ग सुरू करण्यासाठी वापरण्याचा त्यांचा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
१२५० प्राथमिक शाळांपैकी केवळ १२८ प्राथमिक शाळांतील पालकांनी इंग्रजीकरणाची मागणी केली आहे ज्यात बहुसंख्य शाळा या डायोसिसन सोसायटीच्या आहेत. गोव्यातील जनतेने आपल्या लोकशाही हक्काचा वापर करून भारतीय संस्कृतीचा वारसा जपून ठेवण्यासाठी आणि गोव्याची नाळ अखंड भारताशी कायम राहावी यासाठी कॉंग्रेसला प्राथमिक शाळांसाठी जारी केलेले धार्मिक परिपत्रक मागे घेण्यास भाग पाडावे, असे आवाहनही शशिकला काकोडकर यांनी केले आहे.
Wednesday, 29 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment