Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 3 July 2011

गोवा रक्षणाची पताका हाती घ्या!

मनोहर पर्रीकरांचे तरुणाईला आवाहन
पणजी, दि. २ (प्रतिनिधी): ‘‘गोव्याची अस्मिता व संस्कृती रक्षणाची पताका आता युवकांनी आपल्या हाती घेण्याची गरज आहे. युवकांची स्फूर्ती व उत्साह तसेच त्यांची धमक सत्ताधार्‍यांना निश्‍चितपणे पळता भुई थोडी करेल. त्यामुळेच भावी पिढीसाठी गोव्याचे रक्षण करण्यासाठी पुढे सरसावलेल्या युवकांच्या मागे मी ठामपणे उभा राहीन’’, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केले.
भाषा माध्यमप्रश्‍नी सरकारने घेतलेल्या आत्मघातकी निर्णयाला विरोध करण्यासाठी ‘दिगंबर कामत, गेट वेल सून’ ही मोहीम सध्या ‘फेसबुक’ या सोशल नेटवर्कवर सुरू असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. ही मोहीम सुरू ठेवलेल्या युवकांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना पर्रीकर बोलत होते. भाषा माध्यमाच्या विषयाचे राजकारण करण्यात आपल्याला अजिबात रस नाही. हा विषय फक्त राजकारणापुरती मर्यादित नसून तो सामाजिक विषय बनला आहे. विधानसभेत प्राथमिक माध्यम धोरण ‘जैसे थे’ ठेवण्याची घोषणा करून सरकारने लगेच मंत्रिमंडळाकरवी या निर्णय फिरवला. एवढेच नव्हे तर हा निर्णय घेताना प्रशासकीय व कायदेशीर बाबींचेही उल्लंघन करण्यात आले. या निर्णयामागील सरकारची निष्क्रियता व विश्‍वासघातकीपणा गोव्याच्या मुळावरच येणार,असा धोकाही पर्रीकर यांनी बोलून दाखवला.
सरकारच्या या चुकीच्या निर्णयाची माहिती करून देण्यासाठी युवकांनी विविध महाविद्यालयांतून जागृती करावी. विशेषतः अल्पसंख्याक युवकांत गैरसमज पसरविण्याचे जोरदार प्रयत्न कॉंग्रेसकडून सुरू असल्याने त्यांची योग्य पद्धतीने समजूत काढून त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव करून देण्याची गरज आहे. हिंदूंचे गार्‍हाणे व ख्रिस्ती बांधवांचे ‘बेसांव’ हे कोकणीत घातले जाते तर मग शिक्षणात मातृभाषेला विरोध का, असा सवालही त्यांनी केला.
या वेळी उपस्थित युवकांनी विविध महाविद्यालयांत मोठ्या प्रमाणात जागृती मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला. विविध महाविद्यालयांत विद्यार्थ्यांचे गट तयार करून पथनाट्य तथा इतर उपक्रम राबवले जाणार आहेत. १८ ते २५ जुलैपर्यंत काळा पोशाख घालून सरकारचा निषेध करण्याचेही यावेळी ठरले. २५ रोजी महाविद्यालये बंद पुकारण्याची कल्पनाही पुढे आली असून याबाबत भारतीय भाषा सुरक्षा मंचाकडे चर्चा करूनच अंतिम निर्णय घेऊ, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. दिलीप बोरकर, युगांक नाईक, राजदीप नाईक, सुरेश तिळवे, आत्माराम बर्वे, वैभव कामत, यशवंत नाईक आदींनी यावेळी आपले मते मांडली. शेवटी श्री. वर्दे यांनी एक स्फूर्तीगीत सादर केले.

No comments: