पणजी, दि. १ (प्रतिनिधी): कॉंग्रेस सरकारने गोव्यातील प्राथमिक शाळांचे इंग्रजीकरण करण्याचा घाट घालून येथील संस्कृती नष्ट करण्याचे जे कारस्थान रचले आहे, त्याला विरोध करण्यासाठी उद्या दि. २ जुलै रोजी पर्वरी येथील आझाद भवनात संध्याकाळी ३ वाजता भारतीय भाषा सुरक्षा मंचतर्फे गोव्यातील भजनी कलाकारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
इंग्रजाळलेल्या दिगंबर कामत सरकारने उचललेल्या या आत्मघातकी पावलामुळे गोव्याचे वैशिष्ट्य असलेली पारंपरिक भजन संस्कृतीच नष्ट होण्याचा धोका असून काही वर्षांनी मराठी - कोकणी भाषा वाचणारे व बोलणारे लोक शिल्लक राहतील की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारच्या इंग्रजीकरणाच्या धोरणाला कडाडून विरोध करण्यासाठी उद्या गोव्यातील भजनी कलाकार एकत्र येणार आहेत. या मेळाव्यात सरकारी निर्णयाला भजनी कलाकार कसा विरोध करू शकतील, यावर विचारविनिमय होईल.
कवी व नाटककार विष्णू सुर्या वाघ हे या मेळाव्याचे निमंत्रक असून ज्येष्ठ भजनी कलाकार नाना शिरगावकर, वामन पिळगावकर, सोमनाथबुवा च्यारी , मधूसुदन थळी, मनोहर मांद्रेकर, रघुनाथ पेडणेकर यांची यावेळी उपस्थिती असेल. विष्णू वाघ, प्रा. अनिल सामंत, दुर्गाकुमार नावती, प्रा. गोरख मांद्रेकर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. गोव्यातील तमाम भजनी कलाकारांनी या मेळाव्याला उपस्थित राहून मातृभाषेवरील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यास सहकार्य करावे असे आवाहन विष्णू वाघ यांनी केले आहे.
Saturday, 2 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment