मृतदेह ताब्यात घेण्यास नकार - वस्त यांच्या विरोधात पोलिस तक्रार
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून रेटॉल प्राशन केलेला व गेल्या चार दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत असलेला ‘सीआयडी’ विभागाचा वाहनचालक चंद्रू गावस याचे अखेर आज निधन झाले. गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार सुरू असताना दुपारी ४.१५च्या सुमारास डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे घोषित केले.
दरम्यान, चंद्रूच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या पोलिस अधिकार्यांवर कारवाई होत नाही तोवर त्याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे मयत चंद्रूचा भाऊ कमलाकांत यांनी जाहीर केल्याने पोलिस अडचणीत आले आहेत. आज सायंकाळी उशिरा कमलाकांत यांनी संशयित पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार वस्त यांच्या विरुद्ध पणजी पोलिस स्थानकात तक्रार सादर केली आहे. मात्र, या घटनेचीपोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. चंद्रू याच्या मृत्यूनंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्यांची आज उशिरापर्यंत पोलिस मुख्यालयात गुप्त बैठक सुरू होती. आज सकाळी पोलिस महासंचालक डॉ. आदित्य आर्य यांनी ‘सीआयडी’च्या दोन वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना बोलावून घेतले होते. मात्र, त्यांच्यात कोणती चर्चा झाली हे समजू शकले नाही.
दि. २४ जूनच्या रात्री चंद्रू याने दोनापावला येथे रात्री ड्युटीवर असताना रेटॉल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या आत्महत्येला आपले वरिष्ठच जबाबदार असल्याचा मृत्युपूर्व जबाब त्याने विशेष न्यायदंडाधिकार्यांना दिल्याने सध्या तीन पोलिस अधिकारी संकटात सापडले आहेत. त्यांच्यावर कोणत्याही क्षणी गुन्हा नोंद होऊ शकतो.
गेल्या काही महिन्यांपासून एक पोलिस निरीक्षक चंद्रूला लोकांसमोर नेहमी शिवीगाळ करीत होता. त्यामुळे तो तणावाखाली होता. कोणता निरीक्षक त्याला सतावत होता त्याचे नावही त्याने आपल्याला काही दिवसांपूर्वी सांगितले होते, असे त्याचा भाऊ कमलाकांत गावस यांनी आज पत्रकारांना सांगितले. दरम्यान, विशेष न्यायदंडाधिकार्यांनी नोंद करून घेतलेल्या मृत्युपूर्व जबानीत चंद्रू याने तीन पोलिस अधिकार्यांची नावे घेतलेली आहेत. त्यात दोन निरीक्षक आणि एका उपअधीक्षकाच्या नावाचा समावेश असल्याचे खास सूत्रांनी सांगितले.
दोषींवर कारवाई : अरविंद गावस
चंद्रू गावस याने कोणत्या करणासाठी विषप्राशन केले याचा छडा लावला जाणार आहे. त्या चौकशीतून जे बाहेर येईल त्यानुसार दोषींवर गुन्हा नोंद केला जाणार आहे. त्याच्या मृत्युपूर्व जबाबाची प्रत न्यायदंडाधिकार्यांनी न्यायालयात सादर केली आहे. आपल्या मृत्यूनंतर या जबाबाची प्रत पोलिसांच्या ताब्यात देण्यापूर्वी ती न्यायालयात सादर करा, अशी विनंती चंद्रू याने न्यायदंडाधिकार्यांकडे केली होती. त्यामुळे पोलिस उद्या सकाळी तो जबाब न्यायालयातून ताब्यात घेणार आहेत. सध्या अनैसर्गिक मृत्यू म्हणून या प्रकरणाची नोंद केली असून याचा तपास पोलिस निरीक्षक रमेश गावकर करीत आहेत, अशी माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली आहे.
--------------------------------------------------------------------
चंद्रू याचे दि. ९ जुलै रोजी लग्न ठरले होते. त्यामुळे त्याने एका महिन्यापूर्वी रजेसाठी अर्ज केला होता. मात्र, बाळ्ळी घटनेनंतर ‘सीआयडी’ विभागावरील ताण वाढल्याने कोणालाही रजा मिळणार नसल्याचा आदेश गृहखात्याने काढला होता. त्यातच, एका पोलिस अधिकार्याने चंद्रू याला शिवीगाळ करून ‘‘लग्न वैगेरे सर्व विसर; रजा घेतल्यास तुला निलंबित करू’, अशी धमकीच दिली होती. लग्नाला काही दिवस उरलेले असतानाही रजा मिळत नसल्याने उद्विग्न झालेल्या चंद्रूने अखेर आत्महत्येचा पर्याय निवडला.
--------------------------------------------------------------------
वृद्ध आई वडील यांना चंद्रू याचाच आधार होता. आपल्याला नोकरी नसल्याने घरातील सर्व जबाबदारी त्याच्याच खांद्यावर होती, असे कमलाकांत गावस यांनी सांगितले.
Wednesday, 29 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment