गोवा पोलिसांत खळबळ
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): आत्महत्येच्या प्रयत्नात सध्या मृत्यूशी झुंज देत असलेल्या चंद्रू गावस या सीआयडी पोलिसांच्या चालकाने आपल्या मृत्युपूर्व जबाबात तीन वरिष्ठ पोलिस अधिकार्यांची नावे घेतल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे आज दुपारपासून पोलिस खात्यात जबरदस्त खळबळ माजली आहे.
दि. २५ जून रोजी रात्री चंद्रू गावस या ३३ वर्षीय पोलिस चालकाने रेटॉल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सध्या त्याच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार सुरू असून त्याची परिस्थिती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या या प्रकरणाची कोणतीही पोलिस तक्रार नोंद झालेली नाही.
दि. २५ रोजी चंद्रू गावस याने रात्री १२ ते १२.३० च्या दरम्यान दोनापावला येथे सीआयडी विभागात रेटॉल प्राशन केले होते. वरिष्ठ अधिकार्यांच्या जाचाला कंटाळून त्याने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचीही चर्चा सध्या पोलिस खात्यात सुरू आहे. मात्र, कोणते पोलिस अधिकारी त्याला त्रास देत होते, याबद्दल कोणीही बोलायला तयार नाही.
आज सकाळी विशेष न्यायदंडाधिकार्यांनी इस्पितळात जाऊन त्याचा मृत्युपूर्व जबाब नोंद करून घेतला आहे. या जबाबात वरिष्ठांची नावे घेतल्याने चंद्रूला न्याय कोणाकडून मिळणार याबद्दल शंका निर्माण झाली आहे.
रेटॉल घेऊन आत्महत्या केलेल्या नादिया तोरादो प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभागाने पर्यटन मंत्री मिकी पाशेको यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून त्यांना तुरुंगात डांबले होते. मात्र, आता ‘सीआयडी’ विभागातील पोलिस चालकानेच रेटॉल घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिस दोषींवर गुन्हा नोंद करणार काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Tuesday, 28 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment