सरकारातून बाहेर पडण्याची मुख्यमंत्र्यांना धमकी
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): भाषा माध्यम प्रश्नावरून सरकारचा निर्णय बेकायदा असल्याचे सत्य उघड होऊ लागल्याने या निर्णयासाठी हट्ट धरून बसलेले नेते आता अरेरावीवर उतरू लागले आहेत. देखरेख समितीने परिपत्रकातील त्रुटी नजरेस आणून देऊन कायदा खात्याकडून सल्ला मागवण्याचा घेतलेला निर्णय शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांना अजिबात रुचलेला नाही तर, हा निर्णय मागे घेतल्यास सरकारातून बाहेर पडू, अशी धमकीच सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना दिली आहे. त्यामुळे इंग्रजीधार्जिणे मंत्री आता ‘हम करे सो कायदा’ या तत्त्वावर चालू लागल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे.
माध्यमप्रश्नी शिक्षण खात्याकडून जारी करण्यात आलेले परिपत्रक कायद्याच्या कचाट्यात अडकल्याचे उघड झाल्याने या निर्णयाचे मुख्य सूत्रधार सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी आता दादागिरीचे तंत्र अवलंबल्याचे कळते. मातृभाषाप्रेमींनी या निर्णयाविरोधात न्यायालयात आव्हान देण्याच्या सुरू केलेल्या हालचालींची चाहूल लागलेल्या चर्चिल यांनी आता मुख्यमंत्री कामत यांना सरळसरळ धमकावण्यास सुरुवात केली आहे. मातृभाषाप्रेमींच्या आंदोलनाचा धसका घेऊन जर का हा निर्णय रद्द करण्याचा प्रयत्न झाला तर, आपण सरकारातून बाहेर पडू, असा इशारा त्यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. भारतीय भाषा सुरक्षा मंच जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यातील बहुतांश पालकांना इंग्रजीतूनच शिक्षण हवे, असा दावा करून या प्रकरणी जनमत कौल घेण्याचे आव्हानही त्यांनी दिले आहे. मातृभाषाप्रेमींच्या आंदोलनामुळे खुद्द कॉंग्रेसमधीलच काही नेते बिथरल्याची गोष्ट त्यांनी मान्य केली व या नेत्यांच्या दबावाला बळी पडून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय फिरवल्यास राजीनामा देऊ, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
Sunday, 26 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment