- अज्ञातामार्फत धमकी दिल्याची न्यायदंडाधिकार्यांकडून तक्रार
- मृत्यूला जबाबदार असलेल्या अधिकार्यांविरुद्ध मिकींची तक्रार
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): पोलिस वाहनचालक चंद्रू गावस याच्या आत्महत्येला जबाबदार धरून ‘सीआयडी’ विभागाचे निरीक्षक प्रवीणकुमार वस्त यांच्या विरुद्ध आज पणजी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. अधिक चौकशीनंतर अजून काही अधिकार्यांवरही गुन्हा नोंद होऊ शकतो, अशी खबर आहे.
दरम्यान, चंद्रू याचा मृत्युपूर्व जबाब नोंद करणार्या विशेष महिला न्यायदंडाधिकारी मारीया मास्कारेन्हस यांनी आपल्याला धमकी मिळाल्याची तक्रार नोंद केली असून निरीक्षक वस्त यांनीच पाठवलेल्या एका अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणातील आणखी एका नाट्यपूर्ण घडामोडीत माजी पर्यटन मंत्री आणि बाणावलीचे आमदार मिकी पाशेको यांनी चंद्रू गावस याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या सर्व पोलिस अधिकार्यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी करून पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. नादिया तोरादो आत्महत्या प्रकरणात संशयाच्या घेर्यात आलेल्या याच पोलिस अधिकार्यांनी मिकी पाशेको व त्यांचे स्वीय सचिव लिंडन मोन्तेरो यांना तुरुंगात टाकले होते. त्याचा वचपा काढण्याची मिकी यांना चंद्रूच्या आत्महत्येमुळे आयतीच संधी चालून आली आहे. मिकींच्या तक्रारीमुळे पोलिस खात्यात एकच खळबळ माजली आहे.
काल रात्री चंद्रू गावस याचा भाऊ कमलाकांत गावस याने निरीक्षक प्रवीणकुमार वस्त यांच्या विरुद्ध तक्रार केली होती. निरीक्षक वस्त चंद्रूला आई, बहिणीवरून शिव्या देत होता. तसेच, त्याने लग्नानिमित्त केलेला रजेचा अर्जही वस्त यांनी फाडून टाकला होता, असा दावा कमलाकांत याने सदर तक्रारीत केला होता. त्यानुसार पोलिस निरीक्षक रमेश गावस यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून वस्त यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. भा. दं. सं.च्या ३०६ (आत्महत्येला प्रवृत्त करणे) या कलमानुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अशा गुन्ह्यासाठी दोषीला दहा वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावली जाऊ शकते.
नातेवाइकांनी मृतदेह स्वीकारला
आज दुपारी मयत चंद्रू याची शवचिकित्सा करण्यात आली. दोषींवर गुन्हा नोंद होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, अशी भूमिका त्याच्या नातेवाइकांनी घेतली होती. मात्र, आज सकाळीच एका निरीक्षकावर गुन्हा नोंद झाल्याने चंद्रूचा मृतदेह स्वीकारण्यात आला. सायंकाळी त्याच्यावर नादोडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील, असे त्यांनी त्यावेळी सांगितले.
न्यायदंडाधिकार्यांना धमकी दिल्याची तक्रार
चंद्रू याने मृत्युपूर्व दिलेला जबाब बदलण्यासाठी काल रात्री निरीक्षक वस्त यांनी पाठवलेल्या एका अज्ञात व्यक्तीने आपल्याला घरी येऊन धमकी दिली, अशी पोलिस तक्रार न्यायदंडाधिकारी मारीया मास्कारेन्हस यांनी पोलिस महासंचालकांकडे केली आहे. आपल्याला १४ दिवसांचे बाळ आणि साडेतीन वर्षांची मुलगी आहे. पती विदेशात नोकरीला असल्याने आपल्या आणि मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आपल्याला पोलिस सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी विनंती त्यांनी पोलिस महासंचालकांकडे केली आहे. यापूर्वी आपल्याला दोन महिला पोलिस शिपायांची सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्यातील एका शिपायाला काढून घेण्यात आले आणि आता दुसरा शिपाईही हटवण्याची तयारी पोलिसांनी चालवली आहे. चंद्रूचा जबाब नोंद करून आपण न्यायालयाचे काम केले आहे. त्यामुळे तुमच्या पोलिस अधिकार्यांच्या मतभेदाचा आपण का बळी ठरावे, असा प्रश्न त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंद करावा, अशीही मागणीही करण्यात आली आहे.
मिकी, लिंडनकडूनही तक्रार
चंद्रू याच्या मृत्युपूर्व जबाबात सीआयडी विभागाचे पोलिस अधीक्षक चंद्रकांत साळगावकर, निरीक्षक सुनीता सावंत आणि प्रवीणकुमार वस्त या तीन अधिकार्यांची नावे आहेत. त्यामुळे या तिघाही पोलिस अधिकार्यांवर भा. दं. सं. १२०(अ) आणि १२०(ब), ३०६ आणि ३७४ कलमानुसार गुन्हा नोंद करण्याची विनंती करून बाणावलीचे आमदार मिकी पाशेको व त्यांचे स्वीय सचिव लींडन मोन्तेरो यांनी पणजी पोलिस स्थानकात तक्रार सादर केली आहे. वरील तिन्ही अधिकारी मयत चंद्रू याचा छळ करीत होते, असे त्याने आपल्या मृत्युपूर्व जबानीत म्हटले आहे. मृत्युपूर्व जबानीवर संशय व्यक्त करता येत नाही. तसेच, तो अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानला जातो, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेशही असल्याचे मिकी पाशेको आणि लिंडन मोन्तेरो यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
या विषयीचा अधिक तपास पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक रमेश गावकर करीत आहेत.
कुटुंबातील सदस्य गेला : आर्य
‘आम्ही कोणालाही रजा नाकारत नाही. चंद्रू याने दि. २२ जून रोजी रजेसाठी अर्ज केला होता. त्याला रजा दिली जात नव्हती तर त्याने माझ्याकडे तक्रार करायला हवी होती. मात्र, त्याची रजा मंजूर होण्यापूर्वीच त्याने हे पाऊल उचलले. त्यामुळे आमच्या कुटुंबातलाच एक सदस्य गेला’, अशी प्रतिक्रिया आज पोलिस महासंचालक डॉ. आदित्य आर्य यांनी व्यक्त केली. चंद्रू याच्या मृत्यूपूर्वी ‘सीआयडी’ विभागाचे उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर, निरीक्षक सुनीता सावंत, प्रवीणकुमार वस्त व वाहन विभागाचा ताबा सांभाळणारे पोलिस अधीक्षक वामन तारी यांना समन्स पाठवून चौकशी केली असल्याचे आज डॉ. आर्य यांनी सांगितले. तसेच, विशेष न्यायदंडाधिकार्यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांना अधिक सुरक्षा पुरवली जाणार असल्याचे सांगत मिकी पाशेको यांची तक्रार कारवाईसाठी उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांकडे पाठवल्याची माहिती त्यांनी यावेळी पत्रकारांनी केलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना दिली.
Thursday, 30 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment