इंधन दरवाढीविरोधात भाजप महिला आक्रमक
पणजीत भव्य मोर्चा - रस्त्यावर चूल थाटून चहा बनवला
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या गॅस व इतर इंधनाच्या भरमसाठ दरवाढीच्या निषेधार्थ गोव्यातील भारतीय जनता पक्षाच्या महिला सदस्य आक्रमक बनल्या असून केंद्रातील कॉंग्रेस सरकारचा निषेध करण्यासाठी आज गोवा प्रदेश भाजप महिला मोर्चातर्फे पणजीत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी कार्यालयाजवळ रस्त्यावरच चूल पेटवून त्यावर चहा करून केंद्र सरकारचा अभिनव पद्धतीने निषेध करण्यात आला.
आज राज्यातील विविध भागांतून आलेल्या भाजपच्या महिला कार्यकर्त्या डोक्यावर लाकडाच्या मोळ्या घेऊन इंधन दरवाढ विरोधी मोर्चात सहभागी झाल्या होत्या. ‘गॅस वाढ डिझेल वाढ - कॉंग्रेसचे पडो पाड’! ‘भारत माता की जय’! ‘कितली म्हारगाय गो सायबीणी संसार कसो करचो आमी’ ! ‘धिक्कार असो, धिक्कार असो.. कॉंग्रेसचा धिक्कार असो’! अशा जोरदार घोषणा देत त्यांनी राजधानी दणाणून सोडली.
या वेळी बोलताना भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा कुंदा चोेडणकर यांनी वारंवार दरवाढ करून केंद्र सरकार महिलांना संकटात टाकत असल्याचे प्रतिपादन केले. राष्ट्रपतीपदी व युपीए अध्यक्षपदी महिला असूनही या देशात महिलांच्या दुःखाची पर्वा केली जात नसल्याबद्दल त्यांनी कॉंग्रेसवर तोफ डागली. यापुढे रस्त्यावरचा कचरा गोळा करून, तो जाळून महिलांना स्वयंपाक करावा लागेल; त्यामुळे कॉंग्रेस सरकारला सत्तेवरून हटवण्याची नितांत गरज असल्याचे त्या म्हणाल्या.
पणजीच्या नगरसेविका वैदेही नाईक म्हणाल्या की, ‘गरिबी हटाव’चा नारा देत या देशातून गरिबांनाच हटवण्याचाच विडा कॉंग्रेसने उचलला आहे. स्वतः भ्रष्टाचार करून पैसे स्वीस बँकेत ठेवणार्या व लोकांना महागाईच्या आगडोंबात लोटणार्या कॉंग्रेसला धडा शिकवण्याची आता वेळ आली आहे.
ज्येष्ठ नेत्या कृष्णी वाळके यांनी भाजपने आपल्या कारकिर्दीत जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर नियंत्रण ठेवले होते असे सांगून सर्वसामान्यांच्या हितासाठी कॉंगेसला देशातून हद्दपार करण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले. देवबाला भिसे, नीना नाईक, शिल्पा
नाईक आदींनी या प्रसंगी कॉंग्रेसचा धिक्कार केला. यावेळी पणजीच्या नगरसेविका दीक्षा माईणकर, भारती होबळे, शीतल नाईक, माया तळकर, प्रतिमा होबळे, निवेदिता चोपडेकर, श्वेता लोटलीकर, माजी नगरसेविका ज्योती मसूरकर तसेच सविता तवडकर, दामिनी शिरोडकर, माया जोशी, महानंदा अस्नोडकर आदी महिला नेत्या व इतर सक्रिय कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Tuesday, 28 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment