Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 18 April 2011

मलेरिया सर्वेक्षकांचा आज फैसला?

• सेवेत कायम करण्याचे आश्‍वासन
• उपोषणाचे आज ‘बारा’ दिवस

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): गेली पंधरा वर्षे आरोग्य खात्यात मलेरिया सर्वेक्षक म्हणून काम करणार्‍या ५९ कर्मचार्‍यांना उद्या दि. १८ रोजी होणार्‍या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सेवेत कायम करण्यात येण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी या पूर्वीच या कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्याचे आश्‍वासन दिले आहे. मात्र प्रशासकीय सोपस्कार पूर्ण न झाल्यामुळे अजूनपर्यंत या कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्याचे पत्र देण्यात आले नाही अशी कबुली परवा खुद्द मुख्यमंत्र्यांनीच आपल्या बंगल्यावर दिली. त्यामुळे आपणास सेवेत कायम करावे म्हणून दि. ७ एप्रिलपासून आमरण उपोषणाला बसलेल्या या सर्व ५९ कर्मचार्‍यांना उद्याच्या बैठकीत सेवेत कायम करण्याची ‘ऑर्डर ’निघण्याची शक्यता आहे.
गेली १२ ते १५ वर्षे हे मलेरिया सर्वेक्षक कंत्राटावर अल्प रोजंदारीवर काम करत आहेत. त्यांनी आपणास सरकारी सेवेत कायम करावे म्हणून गेली अनेक वर्षे प्रयत्न चालवले असून एकूण तीन वेळा सहकुटुंब उपोषण केले आहे. दोन वर्षापूर्वी कस्टम हाउसजवळील पहिल्या आमरण उपोषणाच्या वेळी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी तिसर्‍या दिवशी या कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्याचे आश्‍वासन देऊन उपोषण मागे घ्यायला लावले, मात्र त्यांनी तेव्हा आपले आश्‍वासन पाळले नाही. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी हे कर्मचारी आरोग्य संचालनालयासमोर सहकुटुंब आमरण उपोषणाला बसले असता दुसर्‍या दिवशी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ‘आपण कुणाला आश्‍वासन देत नाही आणि दिले तर ते पाळतोच’ असे सांगून सेवेत कायम करण्याचे आश्‍वासन देऊन उपोषण मागे घेण्यास लावले. मात्र धाकट्या ‘खाशांनी‘ही आपले आश्‍वासन पाळले नाही. त्यामुळे या त्रस्त कर्मचार्‍यांना पुन्हा दि.७ एप्रिलपासून आमरण उपोषणास बसावे लागले आहे. यावेळी मात्र सेवेत कायम करण्याचे पत्र (ऑर्डर) हातात पडेपर्यंत उठायचे नाही असा निर्धार या कर्मचार्‍यांनी केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी परवा दिलेले आश्‍वासन व उपोषण मागे घण्याचे केलेले आवाहन न पाळता हे कर्मचारी गेले ११ दिवस कांपाल पणजी येथील आरोग्य संचालनालयासमोर उपोषणाला बसले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी दि.१४ एप्रिल रोजी आपल्या बंगल्यावर या कर्मचार्‍यांच्या शिष्टमंडळाला दिलेल्या आश्‍वासनानुसार उद्या दि.१८ रोजी मंत्रीस्तरावरील बैठकीत चर्चा होऊन या सर्व कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्याची ऑर्डर काढण्यात येणार आहे. आज या कर्मचार्‍यांची भेट घेतली असता उद्या होणार्‍या बैठकीत आपणास सेवेत कायम करण्याची ऑर्डर नक्कीच निघेल असा विश्वास कर्मचार्‍यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी आपले आश्‍वासन उशिरा का होईना पाळावे अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच उद्या हनुमान जयंती असून श्री हनुमान आम्हांला पावेल अशी भावना ११ दिवस उपोषण करून कृश झालेल्या या कर्मचार्‍यांनी बोलून दाखवली. दरम्यान या कर्मचार्‍यांपैकी सदानंद महाले यांची तब्येत आज बिघडल्यामुळे रुग्णवाहिकेला बोलवावे लागले. आत्तापर्यंत १० जणांना रुग्णवाहिकेतून हलवण्यात आले आहे.

No comments: