गृहखात्याची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर
पोलिसांसाठी ठरली २२ तारीख अशुभ
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात या राज्यांत दरोडे, वाटमारी, लूटमारी आदी विविध गुन्ह्यांत सामील असलेला कुख्यात गुन्हेगार मायकल फर्नांडिस आज पुन्हा एकदा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जसे चित्रपटांत घडते तसे, यावेळी त्याने आपण पसार होणार असे पोलिसांना सरळसरळ ‘चॅलेंज’ देऊन पोबारा केला आहे. दरम्यान, मायकलचे शुक्लकाष्ठ काही पोलिसांच्या मागून सुटता सुटत नसून या प्रकरणाने राज्य गृहखात्याची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली आहेत.
यापूर्वी २२ फेब्रुवारी २०११ रोजी तो पोलिस व्हॅनमधून उडी टाकून पळाला होता. आज बरोबर २२ एप्रिल रोजी तो पुन्हा पसार झाल्याने पोलिसांसाठी २२ तारीख भलतीच अशुभ ठरली आहे.
याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अनेक राज्यांतील पोलिसांच्या ‘हिटलिस्ट’ वर असलेला मायकल फर्नांडिस याला आज बांबोळी येथे मानसोपचार केंद्रात वैद्यकीय तपासणीसाठी आणले जात असताना अचानक पोलिसांची नजर चकवून तो पसार झाला. त्याचा साथीदार दीपक केरकर याला पकडण्यात मात्र पोलिसांना यश मिळाले. मायकलला जेव्हा पकडले होते तेव्हा, आपण जास्त दिवस तुरुंगात राहणार नाही, अशी दर्पोक्ती त्याने पोलिसांसमोर केली होती. त्याबरहुकूम आज पळ काढून त्याने ती खरीही ठरवली. मायकल फर्नांडिसच्या पलायनाची वार्ता पसरताच सर्व पोलिस स्थानके तसेच तपासनाके तथा रेल्वेस्थानकांवरील पोलिसांना दक्षतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत पोलिस त्याचा शोध घेत होते. परंतु, उशिरापर्यंत तो सापडू शकला नव्हता.
गोव्याचे गृहमंत्री रवी नाईक व त्यांच्या पुत्रांची सुपारी जो बॉय याच्याकडून मायकल फर्नांडिस याला दिल्याच्या घटनेमुळे बरेच वादळ उठले होते व त्यामुळे गोवा पोलिस त्याच्या मागावर होते. या पूर्वी २२ फेब्रुवारी २०११ रोजी मायकलला पणजी न्यायालयातून सडा वास्को येथील तुरुंगात नेत असताना वाटेत चिखली येथे मायकलने पोलिस व्हॅनमधून उडी टाकून पळून जाण्याचे धाडस केले होते. यानंतर ११ एप्रिल २०११ रोजी पणजीचे उपअधीक्षक देऊ बाणावलीकर यांच्या नेतृत्वाखालील तब्बल २६ पोलिसांच्या पथकाने मायकल याला बेतूल - खोला जंगलातून शिताफीने अटक केली होती. त्याने जंगलात लपवलेले एक गावठी पिस्तूल व ६ जिवंत काडतुसे जप्त करण्यातही पोलिसांना यश मिळाले होते. १२ रोजी न्यायालयात उभे केले असता त्याला ९ दिवसांची पोलीस कोठडी फर्मावण्यात आली होती. गोव्यातील त्याच्या गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाल्यानंतर त्याला कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार होते.
मात्र, त्यापूर्वीच मायकलने गोवा पोलिसांचा नाकर्तेपणा पुन्हा एकदा सिद्ध करताना त्यांना गुंगारा देण्यात यश मिळवले. या एकूणच गृह खात्याची नाचक्कीच झाली आहे. एखाद्या गुन्हेगाराकडून पोलिसांना ‘चॅलेंज’ देऊन पलायन करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने पोलिस खात्याच्या एकूण कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Saturday, 23 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment