३८ वाहने भस्मसात, ५ जखमींपैकी ३ गंभीर; २ कोटींची हानी
वास्को, दि. १८ (प्रतिनिधी): ‘झुआरी ऍग्रो केमिकल्स लिमिटेड’च्या बाहेर आज सकाळी ‘गॅस ऍथोरिटी ऑफ इंडिया’कडून दाभाळ ते झुआरीपर्यंत अंतर्गत गॅस वाहिनी घालण्यासाठी जेसीबीद्वारे खोदकाम चालू असताना येथून जाणारी नाफ्ता वाहिनी फुटल्याने ह्या भागात भीषण स्फोट झाला. सदर स्फोटात पाच जण गंभीर जखमी झाले असून ‘झुआरी ऍग्रो केमिकल्स लिमिटेड’च्या बाहेर शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या २८ दुचाक्या, ३ ट्रक, १ टेंपो, ६ चारचाकी व जेसीबी मशीन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत सुमारे दोन कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. स्फोट झाल्यानंतर नाफ्ताच्या वाहिनीत असलेल्या तेलाची गळती चालूच राहिल्याने आग आटोक्यात आणणे कठीण होत असल्याचे दिसून आले तरी सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर सदर आगीवर नियंत्रण आणण्यास यश प्राप्त झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सदर वाहिनी बंद असल्याने येथे होणारा संभाव्य अनर्थ टळला आहे.
आज सकाळी ११.२५ च्या सुमारास सदर भीषण स्फोट व आगीची घटना घडली. बिर्ला, झुआरीनगर येथे असलेल्या ‘झुआरी ऍग्रो केमिकल्स लिमिटेड’च्या बाहेरील खुल्या जागेत दाभाळ ते ‘झुआरी ऍग्रो’पर्यर्ंंत जमिनीखालून गॅस वाहिनी घालण्यासाठी जेसीबीद्वारे खोदकाम चालू होते. यावेळी जमिनीखालून जाणारी ‘नाफ्ताची’ वाहिनी फुटली. यामुळे प्रचंड स्फोट होऊन सुमारे २५ मीटरव्यासापर्यंत आगीचे लोण पसरले. हा स्फोट झाला तेव्हा तेथील पाच जण आगीत भाजल्याने त्यांना इस्पितळात उपचारासाठी त्वरित दाखल करण्यात आले. यातील दोघांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. तर रमाकांत गावकर (४७, रा. केपे), सावियो डिकॉस्ता (रा. शिरोडा) व कैलाश राम (३८, मूळ बिहार) हे या आगीत होरपळल्याने ते गंभीर आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
‘झुआरी ऍग्रो केमिकल्स’ची वाहने उभी करून ठेवलेल्या शेडमध्ये ही आग पोहोचली. यात एकूण ३८ वाहने व जेसीबी मशीन जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच वास्को, वेर्णा, ओल्ड गोवा, मडगाव, पणजी व अग्निशामक दलाच्या मुख्यालयांतून एकूण सात बंब घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्वरित या आगीवर नियंत्रण आणण्यास सुरुवात केली. तसेच ‘झुआरी ऍग्रोच्याही बंबांनी धाव घेत आगीवर नियंत्रण आणण्यास प्रारंभ केला. वास्को, वेर्णा पोलिस स्थानकाच्या जवानांनी व दक्षिण गोव्यातून चार पोलिस पटलून व पोलिस अधिकारी पोहोचले.
नाफ्ता वाहिनी फुटल्याने सुरू झालेली गळती थांबवण्यासाठी अग्निशामक दलाच्या एकूण ५९ जवानांनी दलाचे गोवा प्रमुख अशोक मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे पाच तास अथक प्रयत्न केले व शेवटी आगीवर नियंत्रण आणण्यास यश मिळवले. स्फोटानंतर सदर भागात गवत असल्याने आग सुमारे अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचली. यावेळी दलाच्या जवानांनी ह्या आगीवरही नियंत्रण आणण्यास सुरुवात करत झुआरी ऍग्रोचे कर्मचारी तसेच इतर शेकडो लोकांना ह्या भागातून सुमारे ५०० मीटर दूर पाठवले. या भीषण अपघाताची माहिती मिळताच उपजिल्हाधिकारी लेविन्सन मार्टीन्स, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक ऍलन डिसा, अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत तावडे तसेच ‘झुआरी ऍग्रो केमिकल्स’चे उपाध्यक्ष तथा सी.एफ.ओ विनायक दत्ता, कुठ्ठाळीचे आमदार माविन गुदिन्हो, मुरगावचे मामलेदार, पोलिस उपअधीक्षक तसेच इतर अधिकार्यांनी जवानांना मार्गदर्शन केले.
दरम्यान, सदर घटनेबाबत अग्निशामक दलाचे राजेंद्र हळदणकर यांच्याशी संपर्क साधला असता पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सदर नाफ्ता वाहिनी सुमारे दोन महिन्यांपासून बंद असल्याने पुढचा संभाव्य अनर्थ टळल्याचे सांगितले. नाफ्ताची वाहिनी बंद असली तरी यात सुमारे ५० टन एवढा नाफ्ता असल्याची माहिती श्री. हळदणकर यांनी दिली. गळती सतत चालू असल्याने आगीच्या भडक्यावर नियंत्रण आणण्यास वेळ लागल्याचे सांगितले. नुकसानाचा नक्की आकडा अजून स्पष्ट झालेला नसला तरी हा आकडा दोन कोटींहून जास्त असल्याची शक्यता श्री. हळदणकर यांनी व्यक्त केली. मुरगावचे उपजिल्हाधिकारी श्री. मार्टीन्स यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला जिल्हा न्यायदंडाधिकार्यांकडून या घटनेची पूर्ण तपासणी करण्याचे आदेश प्राप्त झाल्याची माहिती दिली. स्फोट व त्यानंतर लागलेली आग कोणाच्या हलगर्जीपणामुळे लागली याबाबत चौकशी करण्याचे आदेश श्री. मार्टीन्स यांनी वेर्णा पोलिसांना दिले आहेत. आग लागल्याचे वृत्त समजताच आपण दाबोळी विमानतळाला सुरक्षा बाळगण्याबाबत माहिती दिल्याचे श्री. मार्टीन्स यांनी सांगितले. ‘झुआरी इंडियन ऑईल टँकिंग लिमिटेड’ ते ‘झुआरी ऍग्रो केमिकल्स’पर्यंत येणार्या ह्या नाफ्ता वाहिनीचे अडीच किलोमीटर अंतर असल्याचे श्री. मार्टीन्स यांनी सांगितले. साठा बंद असला तरी नाफ्ताच्या वाहिनीत मोठ्या प्रमाणात नाफ्ता होता. त्याची गळती चालूच राहिल्याने आग आटोक्यात आणण्यास सुमारे पाच तास लागल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण तपासणीनंतरच आगीच्या मागील कारण स्पष्ट होईल असे श्री. मार्टीन्स यांनी सांगितले.
‘झुआरी ऍग्रो केमिकल्स’चे जनसंपर्क अधिकारी आनंद राजाध्यक्ष यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क ‘गॅस ऍथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड’चे खोदकाम चालू असताना स्फोट झाला व आग लागल्याची माहिती त्यांनी दिली. संपूर्ण तपासणीनंतरच नुकसानीचा अंदाज येईल. या प्रक्रियेला दोन ते तीन दिवस लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाहिनीत नाफ्ताचा साठा असल्याने हा स्फोट घडल्याचा अंदाज असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
दरम्यान, वेर्णा पोलिसांनी जेसीबी चालक, कॉन्ट्रॅक्टर ऑफ गॅस ऍथोरिटी इंडिया लिमि. व झुआरी इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापनावर भा. दं. सं. ३३७ व ३३८ कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
Tuesday, 19 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment