• स्मृती इराणी यांची कॉंग्रेसवर खरमरीत टीका
पणजीत भाजप महिला मोर्चाचा भव्य मेळावा
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): भ्रष्टाचार व कॉंग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून भ्रष्टाचारामुळे महागाई वाढते आणि महागाईची झळ महिलांनाच जास्त लागते. त्यामुळे महागाई वाढवणार्या कॉंग्रेसला सत्ताभ्रष्ट करा. गोव्यातील कॉंग्रेसचे भ्रष्टाचारी सरकार येत्या निवडणुकीत उलथून टाकण्यासाठी आत्तापासूनच कार्याला लागा असे आवाहन भाजपच्या केंद्रीय महिला मोर्चा अध्यक्षा स्मृती इराणी यांनी आज येथे बोलताना केले.
पणजी येथील गोमंतक मराठा समाज सभागृहात प्रदेश भाजप महिला मोर्चातर्फे आयोजित भव्य महिला मेळाव्याला मार्गदर्शन करताना श्रीमती इराणी बोलत होत्या. या प्रसंगी खासदार श्रीपाद नाईक, प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर इतर भाजप आमदार, प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा कुंदा चोडणकर, गोवा प्रभारी शिल्पा पटवर्धन, कमलिनी पैंगीणकर, मुक्ता नाईक, वैदेही नाईक, नीना नाईक तसेच विविध समित्यांच्या पदाधिकारी, नगरसेविका व्यासपीठावर उपस्थित होत्या.
या मेळाव्याला उपस्थित महिलांनी सभागृह खचाखच भरून गेले होते. उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना श्रीमती इराणी पुढे म्हणाल्या की, देशावर सर्वांत जास्त वर्षे राज्य करणार्या कॉंग्रेसने खुनी, दरोडेखोर, घोटाळेबाज, भ्रष्टाचारी, गुंड, गुन्हेगार यांना नेहमीच आश्रय दिला आहे. त्यामुळेच दररोज एकेक घोटाळा जाहीर होत जगभरात देशाची नाचक्की होत आहे. हे सारे बदलून देशाला वैभवशाली व स्वाभिमानी करतानाच भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्यासाठी महिलांनी पुढे यावे व गोव्यात तसेच केंद्रात भाजपचे सरकार यावे यासाठी कार्य करावे असे आवाहन श्रीमती इराणी यांनी यावेळी केले. महागाई, घोटाळे, आणि भ्रष्टाचार यांचा कॉंग्रेस पक्ष जनक असून देशाचे ‘कमजोर‘ पंतप्रधान या सर्वांना पाठीशी घालत आहेत. प्रत्येक वेळी स्वतः ‘मजबूर’ आहे असे सांगणारे पंतप्रधान देशहित साधू शकत नाहीत. म्हणून भाजपच्या महिला सदस्यांनी राज्यातूनच नव्हे तर देशातून कॉंग्रेसला हद्दपार करण्यासाठी कंबर कसावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.महिला आरक्षणाला सर्वांत प्रथम भाजपनेच समर्थन दिले आहे. भाजप महिलांचा आदर करणारा पक्ष आहे असे सांगून मुलींचे गर्भ मारण्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी केली. तसेच केंद्रातील व राज्यातील ‘निकम्म्या’ कॉंग्रेस पक्षामुळेच गोव्याची बदनामी करणारे चित्रपट निघत आहेत. ‘दम मारो दम’ चित्रपटावरील बंदीसाठी कॉंग्रेस उदास असल्याचे प्रतिपादन केले. आपल्या ओघवत्या भाषणात त्यांनी केंद्र सरकारचे विविध घोटाळे उघड केले.
भाजप महिलांची शक्ती वाढली : पटवर्धन
या प्रसंगी बोलताना गोवा प्रभारी शिल्पा पटवर्धन यांनी सांगितले की गोव्यात २५ हजार महिला भाजपच्या सदस्य झाल्या आहेत. या सर्व महिलांनी येत्या निवडणुकीत कॉंग्रेसला पराभूत करून राज्यात सुशासन आणण्यासाठी पोटतिडकीने कार्य करावे व भाजपला सत्तेवर आणावे असे आवाहन केले.
महिलांवरील अत्याचार वाढले : श्रीपाद नाईक
गोव्यात मंदिरे सुरक्षित नाहीत. महिलांवरील अत्याचारात तर दिवसेंदिवस वाढ होत आहे. भ्रष्टाचार तर कॉंग्रेसचा नित्यनेम होऊन बसला आहे. ड्रग्ज व्यवहारामुळे गोव्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम होत आहे. अशा या काळ्या व्यवहारी कॉंग्रेसला येत्या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी गोव्यातील महिलांनी दुर्गेचे रूप धारण करावे असे आवाहन खासदार श्रीपाद नाईक यांनी यावेळी केले.
महिलांना सन्मानाने वागवणारा पक्ष : पर्रीकर
सध्या देशात व गोव्यात मुलींचे प्रमाण घटत आहे ही चिंतेची बाब असून आपल्या कारकिर्दीत गर्भात मुलींची हत्या होऊ नये व मुलींचे प्रमाण वाढावे यासाठी आपण विशेष प्रयत्न केले होते असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी या प्रसंगी बोलताना केले. महिलांना सन्मान देण्यासाठी भाजपने विविध योजना आखल्याचे सांगून महिलांचा आत्मसन्मान राखणारा पक्ष म्हणजेच भाजप असल्याचे सांगितले.
स्वच्छ राजकारणासाठी महिलांनी पुढे यावे : पार्सेकर
गोव्याच्या उज्वल भवितव्यासाठी गोव्यातील बरबटलेले राजकारण स्वच्छ करणे गरजेचे आहे. व त्यासाठी भ्रष्ट कॉंग्रेस व भ्रष्ट कॉंग्रेस नेत्यांना मांडवीत बुडवण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन प्रदेश अध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या प्रसंगी बोलताना केले.
प्रा. गोविंद पर्वतकर, वैदेही नाईक, शुभदा सावईकर, उल्का गावस, मनीषा नाईक आदींनी आपले विचार व्यक्त केले.
स्मृती इराणी यांच्या हस्ते समई प्रज्वलित करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी भाजपच्या पणजीतील महिला नगरसेविका व विविध मतदारसंघाच्या महिला पदाधिकारी यांचा गुलाबपुष्प देऊन इराणी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. उत्तर गोवा अध्यक्षा स्वाती जोशी व दक्षिण गोवा अध्यक्षा कृष्णी वाळके यांनी जिल्हा समित्यांची यावेळी घोषणा केली. स्वागत कुंदा चोडणकर यांनी केले. देवबाला भिसे यांनी सूत्रनिवेदन केले. तर शिल्पा नाईक यांनी आभार व्यक्त केले.
Friday, 22 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment