• आज चर्चेचा इतिवृत्तांत मिळणार
• फेरबदल झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा
वास्को, दि. १७ (प्रतिनिधी): खारीवाडावासीयांनी सतत दोन दिवस छेडलेल्या आंदोलनानंतर सरकारने येथील घरे वाचवण्याचे तसेच ‘खारीवाडा अफेक्टेड पीपल्स’ समितीच्या इतर चारही मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने सदर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आल्याने वास्को शहरातील सर्व कामकाज आज सुरळीतरित्या चालू झाले. काल झालेल्या बैठकीत सरकारने आश्वासन दिल्यानंतर मध्यरात्रीच ‘एम.पी.टी’च्या हद्दीत नांगरून ठेवलेले सर्व मासेमारी ट्रॉॅलर्स व नौका हटवून जलवाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र सरकारने दिलेल्या आश्वासनात फेरबदल केल्यास तात्पुरते मागे घेतलेले आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा इशारा समितीने दिला आहे. त्यामुळे उद्याचा (सोमवार) दिवस एकदम महत्त्वाचा असल्याचे मानण्यात येत आहे.
सुमारे २० दिवसांपूर्वी न्यायालयीन आदेशानुसार खारीवाडा येथील ६६ घरे पाडण्यात आल्यानंतर या ठिकाणी संतापाची लाट उसळली होती. यामुळे दि.१५ पासून समुद्री वाहतूक रोखण्यात आली होती. तसेच येथील मासेमारीही ठप्प केली होती. तर काल (दि.१६) वास्को बंद पुकारण्यात आला होता. यामुळेे एम.पी.टी तसेच बार्ज मालकांना कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागले. काल संध्याकाळी समितीला सचिवालयात बोलवून मुख्यमंत्री दिगंबर कामत तसेच इतर मंत्री व सरकारी अधिकार्यांनी उर्वरित २९४ घरांवर कारवाई होणार नसल्याचे आश्वासन देण्यात आले. सरकारने खारीवाडा येथील त्या २९४ घरांना वाचवण्याकरिता न्यायालयात धाव घेण्याचे दिलेले आश्वासन, समिती व सरकार यांच्याशी झालेल्या बैठकीचा इतिवृत्तांत उद्या (सोमवारी) त्यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. काल सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर मध्यरात्रीच ‘एम.पी.टी’ची जलवाहतूक मोकळी करण्यात आली.
आज ‘गोवा फिशिग बॉल मालक संघटनेचे’ अध्यक्ष सायमन परेरा यांच्याशी संपर्क साधला असता आंदोलन मागे घेतल्यानंतर आज सर्व मच्छीमारांनी आपला व्यवसाय सुरू केल्याचे सांगितले. सरकारने आम्हांला जे आश्वासन दिलेले आहे त्यात थोडाही बदल झाल्यास सदर आंदोलन पुन्हा छेडण्यात येणार असल्याचा इशारा श्री. परेरा यांनी दिला. तर संघटनेचे सल्लागार रोनी डिसोझा यांच्याशी संपर्क साधला असता मासेमारी व्यवसाय सुरू झाला असून मासेमारी मार्केटही उघडे करण्यात आले आहे. ‘एम.पी.टी’ची जलवाहतूक सुरू केल्यानंतर आज मासेमारी नौका तसेच टॉलर्स खोल समुद्रात मासे पकडण्यासाठी गेल्याचे त्यांनी सांगितले.
Monday, 18 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment