Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 22 April 2011

गोमेकॉतील डॉक्टरांच्या हलगर्जीपणाची चौकशी होणार

प्रसूतीवेळी अर्भकांना गंभीर इजा
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) काल दि.२० रोजी प्रसूतीवेळी शस्त्रक्रिया करताना तीन बालके शस्त्रे लागून जखमी झाल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी होणार असून सदर घटनेचा अहवाल ४८ तासांत देण्याचे आदेश गोमेकॉचे अधीक्षक डॉ. राजन कुंकळ्येकर यांनी प्रसूती विभाग शस्त्रक्रिया प्रमुखांना बजावले आहेत. या प्रकारामुळे गोमेकॉसह सर्वत्र हलकल्लोळ माजला असून निष्काळजीपणे शस्त्रक्रिया करून तीन बालकांना जखमी करणार्‍या डॉक्टरवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
या बाबत सविस्तर हकिगत अशी की, काल दुपारी ३ व ५ वाजता आणि सकाळी ११ वाजता या वेळेत तीन महिला प्रसूत झाल्या. यावेळी तिन्ही महिलांच्या शस्त्रक्रिया करत प्रसूती करावी लागली. मात्र या शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टरच्या निष्काळजीमुळे जन्मलेली ही तिन्ही बालके (मुली) शस्त्र लागून जखमी झाली. एका बालकाच्या तर उजव्या हाताची तीन बोटेच छाटली गेली. दुसर्‍याच्या गालाला जखम झाली तर तिसर्‍या बालकाची पाठ कापली गेली.
याबाबत गोमेकॉचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजन कुंकळ्येकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्रसूती केंद्राच्या शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ. सविता चंद्रा यांना या घटनेची सविस्तर माहिती त्या बालकांच्या सर्व कागदपत्रांसह ४८ तासांत आपणाकडे सुपूर्त करण्याचा आदेश दिल्याचे सांगितले. सदर कागदपत्रे हाती येताच गोमेकॉचे डीन डॉ. व्ही. एन. जिंदाल यांच्याशी विचारविनिमय करून याबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्यात येणार आहे. सध्या ती तिन्ही बालके सुखरूप असल्याचे डॉ. कुंकळ्येकर यांनी सांगितले.
शस्त्रक्रिया करते वेळी सदर डॉक्टरने निष्काळजीपणा केल्याचे सिद्ध झाल्यास त्याला कोणती शिक्षा होईल असे विचारले असता डॉ. कुंकळ्येकर यांनी, अशी घटना पहिल्यांदाच गोमेकॉत घडली असून जर निष्काळजीपणा सिद्ध झाला तर आवश्यक ती कारवाई सदर डॉक्टरवर नक्कीच होईल असे डॉ. कुंकळ्येकर यांनी सांगितले. मात्र अमुकच कारवाई करावी असा कोणताही कायदा नसल्याचे ते म्हणाले. तसेच वरील तिन्ही महिलांवर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर एकदम नवोदित नव्हते तर या पूर्वी त्यांनी प्रसूती शस्त्रक्रिया केली होती असे डॉ. कुंकळ्येकर पुढे म्हणाले. जोपर्यंत आपल्या हातात सदर घटनेची कागदपत्रे येत नाहीत तोपर्यंत आपण या बाबत ठोस काहीही सांगू शकत नाही असे ते शेवटी म्हणाले.
आरोग्यमंत्र्यांकडून दखल नाही
गोमेकॉत एवढी गंभीर घटना घडूनही आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आज दुपारपर्यंत या घटनेची दखल घेतली नव्हती. यामुळे अनेक तर्कवितर्क वर्तवण्यात येत असून गोमेकॉची बदनामी टाळण्यासाठी सदर गंभीर घटना वरिष्ठ पातळीवरून दाबण्याचे प्रकार सुरू असल्याचे कळते.
या गंभीर घटनेत वास्को येथील प्राप्ती प्रकाश कांबळी या महिलेच्या मुलीच्या उजव्या हाताची तीन बोटे कापण्यात आली होती. त्यातील एक बोट जोडण्यात आले आहे. श्री. कांबळी हे या प्रकरणी पोलिस तक्रार दाखल करणार असल्याचे बोलले जात होते मात्र आज दि.२१ रोजी संध्याकाळपर्यंत या प्रकरणी त्यांनी तशी तक्रार केली नव्हती.
गोमेकॉतील या गंभीर घटनेची दखल अनेक स्वयंसेवी संस्था व जागृत नागरिकांनी घेतली असून या घटनेस जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

No comments: