• ३ महिलांकडील लाखोंचे दागिने लुटले
• मडगाव, म्हापसा व वास्कोतील घटना
मडगाव, म्हापसा व वास्को, दि. २१ (प्रतिनिधी): गोव्यातील अस्सल पोलिस यंत्रणा निष्क्रिय बनल्यामुळे तोतया पोलिसांच्या कारवायांना ऊत आला आहे. आपण पोलिस असल्याची बतावणी करणार्या भामट्यांनी आज (गुरुवारी) मडगाव, म्हापसा व वास्कोतील तीन महिलांना लाखो रुपयांच्या दागिन्यांना गंडा घातला. त्यामुळे खर्या पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
मडगावात लाखभराला गंडा
आके येथे आज सकाळी भामट्यांनी पोलिस असल्याची बतावणी करत एका महिलेच्या साधारण लाखभराच्या पाटल्या घेऊन पळ काढल्याची घटना घडली. पोलिस असल्याची बतावणी करून एकट्या असणार्या महिलांना फसविण्याचे प्रकार मडगावात पुन्हा सुरू झालेले असून त्यामुळे घबराटीचे वातावरण पसरले आहे. यामागे एखादी टोळी असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. असा प्रकार गेल्या आठवड्यातही घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहिनी चोडणकर ही महिला आके येथे चालत जात
असताना दोन इसम तिच्याजवळ आले. तिला थांबवून आपण पोलिस असल्याचे त्यांनी सांगितले व या दिवसांत सर्वत्र चोर्या होत असताना हातात घातलेल्या तिच्या पाटल्यांकडे अंगुली निर्देश करून त्या अशा प्रकारे हातात घालून फिरणे बरे नव्हे असे सांगितले. त्यांनी तिच्या हातातील पाटल्या काढायला लावून स्वतःकडील कागदात गुंडाळून तिला परत केल्या व घरी जाऊन त्या काढून ठेव, हातात परत घालू नकोस असे बजावले.
त्यांनी दिलेले पुडके घेऊन ती महिला घरी गेली व पाटल्या कपाटात ठेवण्यासाठी कागदाचे पुडके सोडविले असता आत रिकामी खोके आढळले. तिने लगेच पोलिसांत तक्रार नोंदविली पण तिने केलेल्या वर्णनाचे कोणीही इसम पोलिसांनी आढळले नाहीत. सोन्याचे कडाडलेले दर पाहता दोन पाटल्यांची किंमत लाखावर होते. पोलिसांनी गुन्हा नोंदविलेला आहे.
वास्कोत ६० हजारांना लुटले
वास्को बोगदा येथे राहणार्या सुलक्षणा मोरजे (६०) या महिलेच्या अंगावरील सोन्याच्या बांगड्या व सोन्याची साखळी काढून घेत तिला ६० हजार रुपयांना लुबाडण्याचा प्रकार आज घडला.
वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी १२.३० च्या सुमारास सदर प्रकार घडला. बोगदा येथील गणपती मंदिरासमोर राहणारी सुलक्षणा मोरजे ही महिला बाजार केल्यानंतर घरी परतण्यासाठी बसस्थानकावर येऊन उभी राहिली होती. त्यावेळी तेथे तिला एक अज्ञात इसमाने शहरात सुरक्षा ढासळल्याचे सांगत तिच्या गळ्यातील सोनसाखळी व हातातील दोन सोन्याच्या बांगड्या काढून पिशवीत घालायला लावल्या. सुलक्षणाने त्याप्रमाणे आपल्या अंगावरील सोन्याचे ऐवज काढून त्याच्या हातात दिले. यानंतर त्या इसमाने सदर सोन्याचे ऐवज एका पिशवीत घालून तिच्या ‘बॅगेत’ घातले व नंतर तो येथून निघाला. काही वेळाने बोगदा येथे जाणार्या बसमध्ये सुलक्षणा चढून आपली ‘बॅग’ तपासली असता तिचे सोन्याचे ऐवज गायब झाल्याचे तिच्या लक्षात आले.
सदर अज्ञाताने आपल्याला फसवल्याचे तिला समजताच तिने त्वरित वास्को पोलिसांना ह्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी संपूर्ण शहरात अज्ञाताचा शोध घेतला असता तो सापडला नाही. त्याच्याविरुद्ध वास्को पोलिसांनी भा. दं. सं. ३७९ कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. वास्कोचे निरीक्षक ब्राज मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक फिलोमिना कॉस्ता पुढील तपास करीत आहेत.
म्हापशात दागिने लांबवले
म्हापसा कोर्टजवळ बसची वाट पहात थांबलेल्या शशिकला मसूरकर (७०) या महिलेला आपण पोलिस असल्याचे सांगत तिच्याकडील सुमारे ५५ हजार रुपयांचे सोने हस्तगत केले. म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माऊसवाडा पेडणे येथील शशिकला ही महिला शेट्येवाडा धुळेर येथील आपल्या मुलीकडे आली होती. आज ती घरी परत जाण्यासाठी दुपारी सुमारे तीनच्या सुमारास पेडणे बसची वाट पहात कोर्टजवळील वाहतूक बेटाजवळ उभी होती. तेथे सुमारे ३० ते ३५ वयोगटातील दोन तरुण तिच्याजवळ गेले. त्यांनी तिला आपण पोलिस असल्याचे सांगितले. यावेळी सध्या या भागात चोर्या होत असल्याने आम्हांला खास ड्युटीवर पाठवण्यात आले आहे. त्यामुळे तुझ्या हातातील, गळ्यातील दागिने पिशवीत काढून ठेव असे सांगितले. यावेळी शशिकला हिने आपल्या हातातील दोन पाटल्या व गळ्यातील सोनसाखळी काढून त्या तरुणांच्या हातात दिली. चोरट्यांनी त्या एका कागदात गुंडाळून पिशवीत घालून दिल्या व आपण तेथून पोबारा केला.
बस येण्यास उशीर असून आपणास उघडे उघडे दिसत असल्याने शशिकला हिने दागिने अंगावर घालण्यासाठी पिशवीतील कागद उघडला तर आत तिला तीन दगड व एक डबी सापडली. यावेळी तिला आपल्याला फसवल्याचे समजले. तिने याबाबत म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली. यात ५५ हजार रुपयांना आपल्याला लुटल्याचे तिने नमूद केले आहे. म्हापसा पोलिस तपास करत आहेत.
-----------------------------------------------------------
११ एप्रिलची पुनरावृत्ती
यापूर्वी चालू महिन्याच्या ११ तारखेला अशाच पद्धतीने पणजीतील सांतिनेज येथे शकुंतला नाईक या महिलेकडील सुमारे ५५ हजारांचे दागिने तोतया पोलिसांनी लुटले होते. तसेच म्हापशातील कवळेकर टॉवर येथे दिवसाढवळ्या दोघा भामट्यांनी आपण पोलिस असल्याची बतावणी करत उर्मिला विजय नाईक या महिलेकडील दागिने हातोहात लांबवले होते हे वाचकांना आठवत असेलच.
Friday, 22 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment