सुदीप ताम्हणकरांसह १६जणांना अटक
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): वाहतूक खात्याने काल ३४४ बसेसना कारणे दाखवा नोटीसा पाठविल्याने आणि ५० बसेसचे तात्पुरते असलेले परवाने रद्द केल्याने आज अचानक अखिल गोवा प्रवासी बस मालक संघटनेने सुमारे अर्धा तास बसेस बंद ठेवतप्रवाशांना वेठीस धरले. त्यामुळे आज सायंकाळी पणजी बसस्थानकावर शेकडो प्रवासी अडकून पडले. प्रवाशांना वेठीस धरून बसस्थानकावर गदारोळ माजवल्याने संघटनेचे सचिव सुदीप ताम्हणकर यांच्यासह १५ बसचालकांना अटक करण्यात आली. तर, पोलिसांनी हस्तक्षेप करून प्रवाशांना घेऊन जाण्यास तयार असलेल्या बसेस पोलिस पहार्याने सोडण्यात आल्या. यावेळी पणजी बस स्थानकाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. पणजी उपविभागीय पोलिस उपअधीक्षक देऊ बाणावलीकर व पोलिस निरीक्षक रमेश गावकर हे बस चालकांना जबरदस्तीने बसमध्ये चढून प्रवाशांना घेऊन जाण्यास भाग पाडत होते.
दरम्यान, वाहतूक संचालक अरुण देसाई यांना घेराव घालण्यासाठी गेलेल्या प्रवासी बस मालक संघटनेच्या सदस्यांनी वर्तमानपत्राच्या छायाचित्रकारांना शिवीगाळ केल्याने सुदीप ताम्हणकर यांच्यासह अन्य सदस्यांवर पोलिस तक्रार करण्यात आली आहे. रात्री या सर्वांना अटक करुन वैद्यकीय चाचणीसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात नेण्यात आले होते. अटक केलेल्यांवर पत्रकारांना शिवीगाळ, वाहतूक संचालकांना धमकी व प्रवाशांना आपल्या मागण्यांसाठी वेठीस धरण्याचा गुन्हे नोंद केले आहेत.
बसमालक-पत्रकारांत ‘तू तू मै मै’
‘एस्मा कायदा’ लागू असतानाही बस मालक संघटनेने बंद पाळल्याने काल रस्ता वाहतूक प्राधिकरणाने संपात सहभागी झालेल्या ३४४ बसेसना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. तर, ५० बसेसचा परवाना रद्द केला होता. याकारवाईने भेदरलेल्या बस संघटनेच्या नेत्यांनी आज दि.२० रोजी अचानक दुपारी ३.२० च्या सुमारास वाहतूक संचालक अरुण देसाई यांच्या कार्यालयात घुसत त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. या वेळी उपस्थित असलेल्या पत्रकारांनी विशेषतः छायाचित्रकारांनी या प्रसंगाची छायाचित्रे काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दि.१५ रोजीच्या बंदच्या बातम्या देताना वर्तमानपत्रांनी पक्षपाती भूमिका घेतली असा आरोप करत काही बसमालकांनी पत्रकारांना दुरुत्तरे केली. त्याचवेळी तेथे पोलिस दाखल झाले. या प्रसंगी वाहतूक संचालकांनी बसमालकांना एका तासाने भेटण्यास बोलावले. तेवढ्यात तेथे आणखी काही पत्रकार आले. यावेळी बसमालक व पत्रकारांत बराच वेळ ‘तू तू मै मै’ झाली. पत्रकारांनी गुजचे अध्यक्ष प्रकाश कामत यांच्यासह वाहतूक संचालकांची भेट घेऊन त्यांना बसमालकांवर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी केली. तर श्री. ताम्हणकर व अन्य बस मालकांनी श्री. देसाई यांच्याकडे या नोटिसा मागे घेण्याची मागणी केली. परंतु, त्या नोटिसा रस्ता वाहतूक प्राधिकरणाने बजावल्याने आपण काहीच करू शकत नसल्याचे श्री. देसाई यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संतापलेल्या बस मालकांनी अचानक बसेसची वाहतूक बंद केली. कार्यालय सुटण्याच्यावेळी बसेसची वाहतूक बंद झाल्याने प्रवाशांचे बरेच हाल झाले.
Thursday, 21 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment