सप्तसुरात न्हाली संध्याकाळ
पणजी, दि. १६ (सांस्कृतिक प्रतिनिधी): गोव्यातील नामवंत उद्योजक स्व. मोहन काकुलो यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काकुलो बंधूंतर्फे कला अकादमीच्या मा. दीनानाथ मंगेशकर मंदिरात आयोजिलेल्या ‘स्वरांजली २’ कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात प्रामुख्याने संतूर, तबला, आणि पखवाज यांच्या जुगलबंदीने सर्वांनाच रोमांचित झाले.
दीपप्रज्वलन करून व मोहनबाब काकुलो यांच्या तसबिरीला पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. स्व. काकुलो यांचे सुपुत्र मनोज व सूरज तसेच कला अकादमीचे सदस्य सचिव डॉ. पांडुरंग फळदेसाई आणि डॉ. राजीव महात्मे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी मोहन काकुलो संगीत विद्यालयातर्फे ईशस्तवन सादर करण्यात आले. यशस्वी साठे-सरपोतदार (मुंबई) शास्त्रीय गायनाने मैफलीला शानदार आरंभ झाला. त्यांनी ठुमरी आणि अभंग सादर केले. गोमंतकातील ज्येष्ठ तबलावादक पं. तुळशीदास नावेलकर (तबला) आणि सुभाष फातार्पेकर संवादिनी यांनी त्यांना सुरेख साथ केली. कार्यक्रमाच्या दुसर्या टप्प्यात पं. सतीश व्यास (संतूर) पं. भवानी शंकर (पखवाज) आणि पं. विजय घाटे (तबला) यांचा जुगलबंदीने रसिकांना वेगळ्याच संगीतविश्वात नेले. आपल्या वादनाला सुरुवात करण्या अगोदर पं. व्यास म्हणाले, एखाद्या कलाकाराला जसे पाहिजे तसे पोषक कला संकुल म्हणजे गोव्यातील कला अकादमी. येथील रसिकही जाणकार आणि सुजाण आहेत. त्यामुळे गोव्यात कार्यक्रम करायला मला खूप आवडते.
पं. व्यास यांनी पुरिया राग आरंभी आळवला. मग उत्तरोत्तर ही मैफल रंगत गेली. कार्यक्रमाच्या तिसर्या टप्प्यात इंदूरच्या कल्पना झोकारकर व मुंबईचे डॉ. रामा देशपांडे यांनी नाट्यगीतांचा अनोखा आविष्कार घडवला. त्यांना दया कोसंबे (तबला) व राया कोरगावकर (संवादिनी) यांनी साथसंगत केली. खुमासदार शैलीत डॉ. अजय वैद्य यांनी निवेदन केले.
Sunday, 17 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment