• ३४४ बसेसना कारणे दाखवा नोटीस
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): एस्मा धुडकावून संपावर गेलेल्या ५० बसेसचे तात्पुरते परवाने रद्द केले आहेत.तर ३४४ बसेसना आज वाहतूक खात्याने कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. एकूण ३९४ बसेसवर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आज वाहतूक खात्याचे साहाय्यक संचालक अशोक भोसले यांनी दिली.
अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेने गेल्या १५ एप्रिल रोजी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बंद पुकारला होता. हा बंद मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने एस्मा कायदा लावला होता. परंतु, ‘एस्मा’ला न जुमानता संघटनेने बंद पाळला होता. या बंदमध्ये सहभागी झालेल्या बसेसवर ही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे पुन्हा एकदा बस मालक संघटना आणि वाहतूक खाते यांच्यामधील वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारतर्फे लागू केलेला एस्मा आम्हांला लागत नसल्याचा दावा बस मालक संघटनेने केला आहे.
वाहतूक अधिकारी श्री. भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार म्हापसा येथील ३५, वास्को ३२, केपे ५, फोंडा ८६, डिचोली ४५, पणजी ९० व मडगाव येथील १०१ बस मालकांना कारणे दाखवा नोटिसा बजावलेल्या आहेत. तर, यातील ५० बसेसचा परवाना रद्द केला आहे. येत्या आठ दिवसात त्यांना या कारणे दाखवा नोटिसांवर उत्तर देण्याचे आदेश दिले असून बस मालकांकडून सादर होणार्या उत्तरावर सुनावणी घेतली जाणार असल्याची माहिती श्री. भोसले यांनी दिली. ही सुनावणी रस्ता वाहतूक प्राधिकरणासमोर घेतली जाणार आहे. या प्राधिकरणाचे अध्यक्ष हे उपजिल्हाधिकारी तर, सदस्य सचिव म्हणून वाहतूक खात्याचे साहाय्यक संचालक असल्याचीही त्यांनी सांगितले.
या रस्ता वाहतूक प्राधिकरणावर यापूर्वीच संघटनेने आक्षेप घेतला आहे. या प्राधिकरणावर बस मालक संघटनेचा एकही सदस्य नसल्याने या प्राधिकरणाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाची कोणतीही माहिती मिळत नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. तसेच, प्राधिकरण निर्णय घेताना बस मालकांना विश्वासात घेत नाही. त्यामुळे या प्राधिकरणाच्या समितीवर संघटनेच्या एका पदाधिकार्याची नेमणूक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Wednesday, 20 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment