कोरगाव खाण उत्खननप्रकरणी
• खाण संचालनालयातून कागदपत्रे जप्त
• पेडणे पोलिसांबाबतही प्रश्नचिन्ह
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी)
कोरगाव खनिज उत्खनन प्रकरणातील सर्व कागदपत्रे खाण संचालनालयातून जप्त करण्यात आली असून या प्रकरणातील मुख्य संशयित पेडण्याचे माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. येत्या १० दिवसांत या तपासकामाचा प्राथमिक अहवाल पेडणे न्यायालयात सादर करावयाचा असल्याने गुन्हा अन्वेषण विभागाने या प्रकरणाच्या तपासकामाचा वेग वाढवला आहे.
सदर प्रकरण अजामीनपात्र असून गुन्हा अन्वेषण विभागाने समन्स बजावूनही श्री. देशप्रभू हे ‘सीआयडी’ कार्यालयात हजर राहिले नाहीत. गेले दोन दिवस खाण संचालनालयाचे संचालक अरविंद लोलयेकर यांची जबानी नोंद करून या बेकायदा खाणीविषयीची सर्व कागदपत्रे जप्त केला आहे. तर, उद्या राज्याचे मुख्य वनपाल शशिकुमार आणि वाहतूक खात्याचे संचालक अरुण देसाई यांची जबानी नोंद करून घेतली जाणार आहे.
गेल्या डिसेंबर २०१०मध्ये कोरगाव येथे बेकायदा खनिज उत्खनन होत असल्याची लेखी माहिती खाण संचालनालयाने पेडणे पोलिस स्थानकाला दिली होती. परंतु, त्या माहितीवर पेडणे पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचेही सध्याच्या तपासात उघड झाले आहे. त्यामुळे पेडणे पोलिसांबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोणाच्या आदेशाने पेडणे पोलिसांनी त्या लेखी माहितीकडे दुर्लक्ष केले, याचा तपास लागणे गरजेचे ठरले आहे. तसेच, कोरगाव येथून होणार्या बेकायदा वाहतुकीकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वाहतूक खात्याचे अधिकारीही गोत्यात येण्याची शक्यता आहे.
काशिनाथ शेटये आणि अन्य यांनी केलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणात एका राजकीय व्यक्तीच्या मुलाचाही समावेश असल्याचे म्हटले आहे. याविषयीचा अधिक तपास गुन्हा अन्वेषण विभागाचे उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर करीत आहेत.
Friday, 20 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment